महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हक्काचं मराठी थिएटर का नाही? प्रसिद्ध अभिनेत्याचा रोखठोक सवाल

मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वारंवार याबद्दल ओरड केली जाते. पण अद्याप याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. 

Updated: Apr 4, 2024, 09:59 PM IST
महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हक्काचं मराठी थिएटर का नाही? प्रसिद्ध अभिनेत्याचा रोखठोक सवाल title=

Milind Gawali Post On Theatre Issue : गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. आतापर्यंत अनेक मराठी कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी याबद्दल तक्रार केली आहे. तसेच मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वारंवार याबद्दल ओरड केली जाते. पण अद्याप याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. आता आणखी एका मराठी अभिनेत्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळींना श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे नाट्य गौरव पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. याबद्दल पोस्ट शेअर करताना त्यांनी श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानसह चाहत्यांचेही आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी हा पुरस्कार सोहळा घ्यायला जाताना घडलेला एक किस्साही सांगितला आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट

"श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान नाट्य गौरव पुरस्कार दिल्याबद्दल आणि ते पारितोषिक माझ्या वडिलांचे सहकारी आणि मित्र एडवोकेट धनराज वंजारी यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे. हा गौरव पुरस्कार सोहळा अण्णाभाऊ साठे संकुल जिजामाता उद्यान भायखळा येथे आयोजित करण्यात आलं होतं, ठाण्यावरून "आई कुठे काय करते" या मालिकेचे शूटिंग संपून मी साडेतीन वाजता सेट वरून निघालो, ठाणे मुलुंड घाटकोपर पर्यंत सरळ आलो. मग मला त्या गुगल मॅप मधल्या बाईने फसवलं आणि मग माझी गाडी बीकेसी मधून बाहेर सायनला पडली, सायन धारावीकडून जायच्या ऐवजी मग मी माहीम माहीमचर्च माटुंगा स्टेशन दादर स्टेशन करत करत लोअर परेल आणि लोअर परेल वरून मग भारतमाता थिएटरकडनं उजव्या बाजूला वळालो,

भारतमाता वरून जाताना संख्या माझ्या मराठी चित्रपटाच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या, मुंबईला लागलेले माझे अनेक सिनेमे भारतमाता मध्येच लागले होते, आणि चित्रपटांचे प्रीमियर भारतामध्ये झाले होते, मराठी चित्रपटाला शुअर शॉट पैसे मिळवून देणारं मुंबईतलं एकमेव मराठी थिएटर भारतमाता, आज ते बंद पडलेल्या अवस्थेत बघताना वाईट वाटलं, आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी फक्त मराठी थेटर आहे का कुठे ? जिथे फक्त मराठी सिनेमा लागतात? खरंच असायला हवं की नको ? आपल्या मराठी माणसांच्या हक्काचं मराठी थेटर ? मराठमोळ थेटर ...

पण खरंच किती वाईट आहे हे ? मुंबईत महाराष्ट्रात भोजपुरी चित्रपट धो धो चालतात , नेपाळी पिक्चर पण हाउसफुल चालतात, दक्षिणातले चित्रपट तर चालतात चालतात, पाश्चिमातल्या देशातले चित्रपट भरघोस चालतात, तसे मराठी चित्रपट चालतात का ?
मराठी माणसांना मराठी चित्रपट बघायला आवडत नाहीत का ? आपण मराठी माणसांनी जर असं ठरवलं की आपण फक्त मराठी सिनेमेच बघणार, दोन पाच मराठी चित्रपट बघितल्यानंतर एखादा चित्रपट आपण दुसऱ्या भाषेतला बघायचा. मराठी चित्रपट सृष्टीचे चित्र पालटून जाइल .असो ! असे विचार डोक्यात येऊन गेले", असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहते कमेंट करताना दिसत आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडने अभिनंदन सर असे म्हणत मिलिंद गवळींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक चाहत्यांनी पोस्टवर अभिनंदन म्हणत कमेंट केली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x