Bol Bachchan Gang: खार पोलिसांनी मंगळवारी बोल बच्चन गँगमधील दोन जणांना अटक केली आहे. तसंच, त्यांच्याकडून 1.31 लाखांचे सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. अनुज बापूनाथ काळे 24 आणि बालाजी रोहिदास पवार 20 अशी आरोपींची नावे असून गंगाखेड परभणी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा आरोपींविरोधात विविध पोलिस ठाण्यात 50 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गँग मुंबई आणि महाराष्ट्रातील वृद्ध व्यक्तींना टार्गेट करायचे. वृद्धांना एकट गाठून त्यांना फ्री कॅश, साडी, रेशन असे आमिष दाखवून त्यांना लुटण्यात यायचे. आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी गुन्हे केल्यानंतर ते वाहने, कपडे आणि वेष बदलायचे. पोलिसांनी म्हटलं आहे की, ही चोळी रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसोबत संपर्क साधून त्यांना मिठाई द्यायचे तसंच, आपल्या बॉसला अनेक वर्षांनी मुलगा झाला आहे. त्यासाठी साड्या, पैसे आणि मोफत रेशन वाटण्यात येत आहे. असं आमिष दाखवायचे.
बोल बच्चन गँगमधील आरोपी जेष्ठांना असे सांगायचे की, टोळीतील आरोपी जेष्ठ नागरिकांचे दागिने काढून त्यांच्या पर्समध्ये किंवा पाकिटात ठेवण्यास सांगायचे. जेणेकरुन ते वरिष्ठांसमोर गरिब दिसतील. त्यानंतर आरोपी हालचलाखी करुन जेष्ठ्यांचे सामान चोरायचे. खार पश्चिम येथील रहिवाशी सलमा गुलामनबी कुरेशी यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला बाजारात जात असताना तिच्याजवळ एक आरोपी आला. त्यानंतर तिला सांगितले की, आमच्या बॉसला मुलगा झाला असून तो ज्येष्ठ नागरिकांना पैसे आणि साड्यांचे वाटप करत आहेत. माझ्यासोबत या. आरोपीवर विश्वास ठेवून महिला त्याच्यासोबत जायला निघाली. त्यानंतर त्याने तिला सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवायला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून कुरेशीने दागिने पर्समध्ये काढून ठेवले. त्यानंतर तो आरोपी गायब झाला, असं पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 ते 12.35 दरम्यान खारदांडा परिसरात घडली आहे.
पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलं आहे. खार, वांद्रे, सांताक्रुझ, खेरवाडी परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं होतं. संशयितांची ओळख पटवली आणि आरोपी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळ रचून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.