'पानिपत'च्या रणसंग्रामात झळकणार मराठमोळी 'बाप-लेका'ची जोडी

यात एक सेलिब्रिटी जोडी अशी आहे जी..... 

Updated: Nov 13, 2019, 11:17 AM IST
'पानिपत'च्या रणसंग्रामात झळकणार मराठमोळी 'बाप-लेका'ची जोडी
पानिपत

मुंबई : ऐतिहासिक कालखंडातील आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतीव महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर या चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज प्रेक्षकांना आला. 

ट्रेलर मागोमाग या चित्रपटातील काही महत्त्वाच्या भूमिकांवरुन अधिकृतपणे पडदा उचलण्याचं सत्र कलाकारांनी सुरु केलं. ज्यामध्ये काही मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी लागल्याचं लक्षात येत आहे. पानिपतच्या युद्धावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात मराठमोळा बाज जपण्याच्या उद्देशाने यामध्ये काही मराठी कलाकारांचा सहभागही पाहायला मिळत आहे. यात एक सेलिब्रिटी जोडी अशी आहे, जी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे. ही जोडी आहे, सेलिब्रिटी वडील आणि मुलाची. 

मराठी चित्रपटांमध्ये एक काळ गाजवणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे त्या काळजे 'हँडसम हंक' रवींद्र महाजनी आणि त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाच 'पार्वती बाईं'ची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री क्रिती सेनन हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांचे लूक सर्वांसमोर आणले. 

पानिपतच्या युद्धाभोवती फिरणारा काळ आणि त्या काळातील घडामोडींमध्ये या दोन्ही व्यक्तींचं योगदान  पाहता चित्रपटात त्यांच्या भूमिका साकारणाऱ्या या दोन्ही कलाकारांना पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाय कलाकारांमधील कोणाला प्रेक्षकांची पसंती मिळते म्हणजे मल्हारराव साकारणारे रवींद्र महाजनी पुन्हा त्यांची जादू करतात की, गश्मीरही त्याच्या अंदाजाची छाप पाडून जातो याकडे अनेकांचं लक्ष असेल.