मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय असलेली अभिनेत्री म्हणून राधिका आपटेला ओळखले जाते. राधिकाने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दमदार आणि हटके अभिनय साकारत तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच राधिका आपटेला विमानतळावर एका धक्कादायक अनुभवाला सामोरे जावं लागलं. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.
राधिका आपटेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत विमानतळावर काही लोक अडकल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही लोक हे सुरक्षारक्षकांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. तसेच राधिकाने तिचे आणि तिच्या टीमचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोत ती जमिनीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने घडलेला प्रकार सांगितला आहे.
"अखेर मला ही गोष्ट पोस्ट करावी लागत आहे. माझी आज सकाळी 8.30 वाजताची फ्लाईट होती. आता सकाळचे 10.50 झाले आहेत. तरीही अद्याप फ्लाईटचा काहीही पत्ता नाही. फ्लाईट लवकरच येईल, असं आम्हाला वारंवार सांगितले जात आहे. तसेच आम्हा सर्व प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवून बाहेरुन बंद करण्यात आलं आहे. यातील काही प्रवाशी हे लहान मुलांबरोबर प्रवास करत आहे. गेल्या तासाभरापासून अनेक लहान मुलं, वृद्ध प्रवाशी या सर्वांना कोंडून ठेवलं आहे. इथे असलेले सुरक्षारक्षक दरवाजा उघडण्यासही तयार नाही. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती नाही. त्यांचे क्रू मेंबर्स आलेले नाहीत. शिफ्टमध्ये बदल झाल्याने ते अजूनही नवीन क्रूची वाट बघत आहेत. आता नवीन क्रू केव्हा येईल? याची काहीही माहिती नाही.
आम्हाला असं किती वेळ बंद करून ठेवणार याबाबतही काहीच माहिती नाही. मी बाहेर असलेल्या एका मुर्ख कर्मचारी महिलेशी बोलले. तर तिने मला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, असं सांगितले. आता १२ वाजेपर्यंत ना पाणी ना वॉशरुम काहीच सुविधा नाही! या सुंदर प्रवासासाठी खूप धन्यवाद!", असे राधिका आपटेने म्हटले. राधिकाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता सुयश टिळकने 'मुंबई विमानतळ हे दिवसेंदिवस खराब होत आहे', असे म्हटले आहे. तर अमृता सुभाषने 'अरे देवा' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान राधिका आपटे ही लवकरच 'मेरी क्रिसमस' या चित्रपटात झळकली. यात ती कतरिना कैफ आणि विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिच्या आठवड्यात 7 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता लवकरच ती 'अक्का' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.