SSC HSC Exam: राज्यामध्ये दहावी तसेच बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत. मंडळाचा निर्णय योग्य असला तरी सीसीटीव्ही साठीचा खर्च कोणी करायचा यावरून पेच निर्माण झाला आहे.
राज्यात होऊ घातलेल्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश मंडळाने काढले आहेत. इतकंच नाही तर वीजपुरवठा खंडित झाल्यास सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडू नये यासाठी इन्वर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था करावी लागणार आहे. सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झालेले चित्रीकरण विशिष्ट कालावधीसाठी जपून ठेवावं लागणार आहे. आदेशाच्या अंमलबजावणीबाबत शाळांचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुखांकडून हमीपत्र घेण्यात येत आहे.
कॉपीमुक्त तसेच भयमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळानं हे पाऊल उचललं आहे. परीक्षेदरम्यान कॉप्यांचा सुळसुळाट किंवा सामूहिक कॉपीचे प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतात. विद्यार्थी, पालक इतकच काय तर शिक्षक आणि संस्थाचालक देखील त्यात सहभागी असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या निर्णयाचं पालकवर्गातून स्वागत होत आहे.
राज्यामध्ये दहावीची सुमारे 5000 तर बारावीची सुमारे 3000 परीक्षा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर किमान 10 सीसीटीव्ही बसवावे लागणार आहेत. एका सीसीटीव्हीसाठी साधारणपणे 20 ते 22 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सीसीटीव्ही यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. शिक्षण मंडळाचा निर्णय योग्य आहे मात्र सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक निधी शिक्षण मंडळानं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शाळांकडून होत आहे.
परीक्षेतील गैरप्रकार ही शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. कॉपी, पेपरफुटी किंवा गुण वाढवून देण्याच्या प्रकारांमुळे अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असतो. त्यामुळे मंडळाची भूमिका आणि निर्णय योग्यच आहे. प्रश्न फक्त खर्चाचा आहे. शाळांवर हा भुर्दंड टाकल्यास शाळांकडून शुल्कवाढीची शक्यता आहे. तिचा फटका आपसूकच पालकांना बसणार आहे. त्यामुळे या विषयात शासनाने लक्ष घालून मध्यममार्गी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्या आठवडयापासून घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.