सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : Hyderabad सामूहिक बलात्त्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरवर hyderabad police encounter आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये कोणी या एन्काऊंटवरचं समर्थन केलं आहे, तर कोणी याप्रकरणी वेगळाच दृष्टीकोन समोर ठेवला आहे. या मुद्द्यावर व्यक्त होण्यापासून कलाविश्वही दूर राहिलेलं नाही.
'कच्चा लिंबू'सारख्या संवेदनशील विषयाला हात घालणाऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सदर प्रकरणावर आपुलं मत मांडलं आहे. 'एन्काऊंटरपूर्वी त्या ठिकाणी अराजक माजणं (पोलीसांची शस्त्र आरोपींनी हिसकावण्याचा प्रयत्न करणं) ही घटनाच फिल्मी वाटत आहे. आपण ज्या काळात वावरत आहोत, ज्या प्रगतीशील देशात आपण राहत आहोत तिथे इतक्या सैल पद्धतीने अशा पद्धतीच्या (बलात्कार प्रकरणीच्या) आरोपींना हाताळलं जाणं, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न करणं हीच मुळात चिंतेची बाब आहे', असं म्हणत झाल्या प्रकारणी सोनाली कुलकर्णी यांनी निष्काळजीपणाचा सूर आळवला.
एन्काऊंटर प्रकरणाकपलीकडे पाहिलं असता, हैद्राबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण, उन्नाव प्रकरण किंवा नुकतच एका सहा वर्षांच्या मुलीवर झालेले अत्याचार या सर्व घटना पाहता कुठेतरी लैंगिक प्रशिक्षणही अतीशय गरजेचं आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. स्त्रीसमानतेसाठी आपण झटलो. अनेक दशकं यासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यांचं रक्त आटवलं. पण, आता कुठेतरी किमान शिक्षित वर्गाकडून तरी समानतेलाही समान दृष्टीकोनातून पाहण्याची गरज वाटू लागली आहे असं लक्षवेधी वक्तव्य त्यांनी केलं. समानता या शब्दाची व्याप्ती ही जाणून घेण्याची गरज वाटू लागल्याचं त्यांचं म्हणणं येथे स्पष्ट झालं.
'Hyderabad एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको'
'पुरुषांच्या मासिकतेकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. वयात येणारी मुलगी जितकी नाजुकपणे हताळली जाते, तितक्याच नाजूकपणे मुलगाही हाताळला गेला पाहिजे. कारण, त्याच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल हे फार नैसर्गिक आहेत. त्यामुळे हे बदल होणं, आकर्षण वाटणं हे सारंकाही शिक्षणात येणं गरजेचं आहे. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन हे सारंकाही कुटुंबातच कुठेतरी आलं पाहिजे', असं त्या म्हणाल्या. लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अधोरेखित करत, 'मुलींना छान दिसायला आवडंत केस मोकळे सोडायला आवडतं तसंच मुलांनाही नवं टीशर्ट घालायला आवडतं', असं उदाहरण त्यांनी दिलं ज्या माध्यामातून त्यांनी कुटुंब पातळीपासूनच लैंगिक शिक्षण आणि संवाद अतीव महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. या कुटुंबामध्ये आपली शाळा, कुटुंब, शेजारी, नातेवाईक यांचा समावेश असतो.
विविध वयोगटातील पुरुषांकडून जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्यापूर्वी आपण एक समाज म्हणून, 'जास्त बोलू नका', ते काका असेच आहेत.... तू यांच्याकडे ते असताना जाऊ नकोस' असं म्हणत दुर्लक्ष केलं जातं. पण, असं करण्यापेक्षा आपण याप्रकरणी आवाज का उठवत नाही? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हैदराबाद बलात्कार एन्काऊंटर प्रकरण, उदयनराजे म्हणतात...
एक नागरिक म्हणून आपण एकमेकांना कायम सजग राहण्यास मदत केली पाहिजे असं सांगत सोनाली यांनी न्यायव्यवस्था आणि पोलिसांकडून आरोपींना कठोरातील कठोर आणि संस्मरणीय शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही केली. शिक्षा इतरी कठोर हवी, ज्याची दहशत लोकांमध्ये निर्माण होईल, जेणेकरुन आपण हे करायचं नसतं याची समाजालाही जाणीव असेल ही बाब मांडत सामाजिक भान जपलं जाणं आणि न्यायव्यवस्थेचा दरारा असणं किती महत्त्वपूर्ण असतं हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांजला. किंबहुना आपल्या वक्तव्यातून या सर्व प्रकरणी त्या थेट राष्ट्रपतींनाच एक निवेदन करणार असल्याचं सांगितलं.
आपला समाज असा काही मोकाट सुटला आहे की आपल्याला या साऱ्याची फिकीर राहिलेली नाही, असं म्हणत असताना या दुष्कृत्यांविषयीचा संताप त्यांनी व्यक्त केला. 'बलात्कार करणाऱ्या आरोपींना शिक्षा काय असावी हे मी सांगू शकत नाही. पण, अद्दल घडेल अशी शिक्षा दिली गेलीच पाहिजे कारण, जन्माला आलेल्या मुलीपासून वयोवृद्ध, मरणाच्या दारी पोहोचलेल्या महिलेपर्यंत ज्यांना स्तन आणि लिंग आहे अशा स्त्री नावाच्या एका प्राण्यावर अत्याचार होत आहेत हे थांबलंच पाहिजे. पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन कौटुंबीक पातळीवर गोष्टी दडपून ठेवण्यापेक्षा महिलांनीच या गोष्टींवर, दृष्कृत्यांवर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. अशा कर्माचा, कृत्यांचा आणि गलिच्छपणाचा जाहीर निषेध झालाच पाहीजे', अशी ठाम भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी मांडली.