मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून वाद 

Updated: Jun 15, 2021, 10:33 AM IST
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकाराला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अभिनेता मयुरेश कोटकर याला ताब्यात घेतलं आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह मजकूर वागळे इस्टेटमधील शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आला. जानकर यांनी याबाबत श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत, कोटकर यांच्याविषयी तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोटकर याला तत्काळ अटकही केली. त्यानंतर पोलिसांनीच फेसबुकवरून हा आक्षेपार्ह मजकूर डिलीट केला.

नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. मयुरेशनेसुद्धा हीच मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्याने फेसबुकवर याबाबत अनेक पोस्टस केल्या आहेत. यातच एका आक्षेपार्ह पोस्टवरून त्याला अटक करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मयुरेशला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.