Ashish Patil Working Sanjay Leela Bhansali : बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सध्या त्यांच्या हिरामंडी या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. येत्या 1 मे पासून ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या या चित्रपटाचे पोस्टर, गाणी, ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वेबसीरिजमध्ये अनेक नृत्यांचा समावेश आहे. या नृत्यांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठमोळा आशिष पाटीलने सांभाळली आहे. आशिषने आता संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
मराठीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक म्हणून आशिष पाटीलला ओळखले जाते. 'लावणीकिंग' म्हणून तो कायमच चर्चेत असतो. आता आशिष पाटीलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने संजय लीला भन्साळींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने भन्साळींचे आभार मानले आहेत.
"कोण म्हणतं स्वप्नं पूर्ण होत नाहीत... माझं एक स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. मी कायमच दिग्गज चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि माझे हेच स्वप्न गेल्यावर्षी सत्यात उतरले. गेल्यावर्षी मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्याक्षणी माझ्या हृदयात आणि मनात काय चालले होते, हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण मी खूप भारावून गेलो होतो. मी त्यांना भेटलो तेव्हा ते खूपच नम्र आणि मृदुभाषी आहेत हे मला जाणवलं आणि मी मात्र प्रचंड उत्साहात होतो.
मला त्यांच्या हिरामंडी या कलाकृतीसाठी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. मला दिलेल्या या संधीसाठी मी त्यांचे आयुष्यभरासाठी आभार मानू इच्छितो. हिरामंडी ही वेबसीरिज 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. सर तुम्ही परिपूर्णता आणि नम्रतेचे प्रतीक आहात. मला तुमच्यासोबत काम करता आले, तुमचे मार्गदर्शन मिळाले, हे माझं खरोखरंच भाग्य आहे. तुमच्याबद्दल मनापासून प्रेम आणि आदर वाटतो. सर्वात शेवटी देवाचे खूप खूप आभार आणि त्यासोबतच माझ्या सर्व हितचिंतकांचे धन्यवाद", असे आशिष पाटीलने म्हटले आहे.
दरम्यान आशिष पाटील हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील चंद्रा या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शन केले होते. त्यानंतर आता तो संजय लीला भन्साळींच्या हिरामंडी या वेबसीरिजचे नृत्यदिग्दर्शन करताना दिसत आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच यात अभिनेता फरदीन खान, शेखर सुमन, ताहा शाह आणि अध्ययन सुमन हे कलाकारही झळकणार आहेत.