'अग्गंबाई....', पाहा सासू झाली आई

नव्या वळणासह मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला   

Updated: Jul 8, 2020, 08:32 PM IST
'अग्गंबाई....', पाहा सासू झाली आई

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्यानं वाढू लागल्याचं लक्षात येताच सावधगिरीचं पाऊल म्हणून शासनाकडून अधिकृतपणे लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी अनेक व्यवहार ठप्प झाले. अगदी कलाविश्वसुद्धा यात मागे राहिलेलं नव्हतं. मालिका, नाटक, सिनेमा असे सर्व व्यवहार लॉकडाऊनच्या या काळात ठप्प झाले होते. जवळपास तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ पाहत आहेत. 

शाससनाकडून आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत मालिकांच्याही चित्रीकरणांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत असणाऱ्या अशाच मालिकांपैकी एक म्हणजे, निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान यांच्या भूमिका असणारी 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका. 

लवकरच ही मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यावेळी सासूबाई मात्र काहीशा वेगळ्या आणि तितक्याच अनपेक्षित रुपात दिसणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश गोष्टी बदलत असताना या साध्याभोळ्या सासूबाईंचा अंदाजही बदलला आहे. मालिकेच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ हेच सांगत आहे. 

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये बबड्याला वठणीवर आणण्यासाठी त्याची आई, म्हणजेच शुभ्राची सासू चक्क तिच्या लाडक्या मुलाला रागे भरताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर ती आपण शुभ्राची सासू नव्हे तर, आईच असल्याचंही सांगत आहे. त्यामुळं सासूबाईंची ही भूमिका आता मालिकेत नेमकी कोणती वळणं आणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.