'पदक जिंकल्यावरच आम्ही भारतीय नाहीतर, चिनी, चिंकी, नेपाळी'; मिलिंद सोमणच्या पत्नीचा संताप

अंकिताने पोस्टमध्ये काय लिहिलं? 

Updated: Jul 27, 2021, 07:37 PM IST
'पदक जिंकल्यावरच आम्ही भारतीय नाहीतर, चिनी, चिंकी, नेपाळी'; मिलिंद सोमणच्या पत्नीचा संताप  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : टोकियोमध्ये सुरु असणाऱ्या ऑलिम्पिक खेळामध्ये (Olympic Games Tokyo 2020) भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं रौप्य पदकाची कमाई केली. पूर्वोत्तर भारतातील इंफाळच्या मीराबाईनं केलेल्या कामगिरीमुळं सर्वांची मान अभिमानानं उंचावली. पण, हे सारं कौतुक क्षणिक असल्याच्या जाणिवेपोटी अभिनेता मिलिंद सोमण याच्या पत्नीनं संतप्त भावनेनं एक सोशल मीडिया पोस्ट करत भेदभावाच्या मानसिकतेवर निशाणा साधला आहे. 

अंकिताने पोस्टमध्ये काय लिहिलं? 
'तुम्ही जर पूर्वोत्तर भारतातील असाल तर, तुम्ही तेव्हाच भारतीय असता, जेव्हा तुम्हाला देशासाठी एखादं पदक मिळतं. अन्यथा आम्ही चिंकी, चिनी, नेपाळी आणि आता आता तर यात भरीला कोरोना हे नावंही आलं आहे', असं लिहित भारतामध्ये जातीयवाद असण्यासोबतच वर्णभेदही पाहायला मिळतो याची खंत तिनं तीव्र शब्दांत व्यक्त केली. आपल्या अनुभवावरुनच ही पोस्ट लिहित अंकितानं मनातील संतापाला वाट मोकळी करुन दिली. 

अंकितानं व्यक्त केलेली ही स्पष्ट भावना पाहता नेटकरी आणि फॉलोअर्सही यावर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले. देशामध्ये एकिकडे विविधतेत एकता असल्याचं म्हणतानाच दुसरीकडे मात्र याच समजुतीला तडा जात असल्याचं पाहून काहींनी नाराजी व्यक्त केली. 

अंकितानं लिहिलेली ही पोस्ट पाहता खरंच देशातील नागरिकांचा अमुक एका प्रांताकडे आणि तेथील नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची नितांत गरज असल्याचंच स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे प्रगतशील राष्ट्र म्हणून ओळख असणाऱ्या भारतामध्ये दिसून येणारी ही वर्णभेदाची परिस्थिती देशहिताच्या दृष्टीनंही घातक आहे हेच अंकिता कोनवार हिची पोस्ट वाचून लक्षात येत आहे.