मुंबई : 'कभी कभी तो लगता है अपुनीच भगवान है....' असं म्हणणारा 'गणेश गायतोंडे' आठवतोय का? गेल्या काही दिवसांपासून वेब सीरिज आणि एकंदर संपूर्ण कलाविश्वात चर्चेत असणाऱ्या 'सेक्रेड गेम्स' मधील हा संवाद आणि त्यातीलच तो 'गणेश गायतोंडे'. स्वत:ला सर्वशक्तीशाली म्हणवणारा हा 'गणेश गायतोंडे' म्हणजेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांची मनं अशी काही जिंकून गेला की पाहता पाहता अनेकांच्या बोलण्यात आणि चर्चांमध्ये त्याचाच उल्लेख होऊ लागला. 'नेट्फ्लिक्स इंडिया'च्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी नेटफ्लिक्सकडूनच याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या वेब सीरिजची लोकप्रियता पाहता त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा काही सेकंदांच्या व्हिडिओद्वारे करण्यात आली.
'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या भागात सरताज सिंग (सैफ अली खान) हा आपल्या शहराच्या म्हणजेच मुंबईच्या संरक्षणासाठी लढताना दिसणार आहे. तर दुसरीकडे गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) हासुद्धा पुन्हा एकदा त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज असल्याचं कळत आहे.
'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या भागाचं चित्रीकरण हे भारतासोबतच परदेशातही करण्यात आल्याचं वेब सीरिजच्या टीमकडून कळत आहे.
अनुराग कश्यप याने या वेब सीरिजसाठी नवाजच्या भूमिकेचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी घेतली आहे. तर, 'मसान' या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घैवान यांनी सैफ साकारत असलेल्या भूामिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.
कलाकाकारांची फौज, तगडे संवाद आणि प्रभावी कथानक यांच्या बळावर आता 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या भागातून नेमका कोणता थरार पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आणि तितकच औत्सुक्याचं ठरणार आहे.