मुंबई : स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत ट्विस्ट आलाय पण तो मालिकेतील पात्रांमध्ये नाही तर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये. मालिकेची लोकप्रियता पाहता चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का आहे.
या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र याप्रकरणी आता मालिकेतील सहकलाकारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मालिकेत किरण माने यांच्यासोबत श्रावणी पिल्लई, सविता मालपेकर आणि दिव्या पुगांवकर यांच्यासह अनेक कलाकार काम करतात. या कलाकारांनी किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत.
किरण मानेंच्या गैरवर्तवणुकीमुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे प्रतिक्रिया या सर्वांनी दिली आहे. कलाकारांचे गंभीर आरोप प्रेक्षकांसाठी धक्कादायक आहेत.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरी पाटील म्हणजेच ‘माऊ’ची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर हिने याप्रकरणी तिचे मत व्यक्त केले आहे. “किरण माने आणि माझे बोलणंच व्हायचे नाही. जेव्हा मी सुरुवातीला या सिरीअलच्या सेटवर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तुझ्या वडिलांचा रोल प्ले करणार आहे. तर आपण सेटवरही असेच राहूया. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. सुरुवातीचे महिने फार उत्तम गेले,” असे ती म्हणाली.
“त्यानंतर मला ते विविध गोष्टींवर टोमणे मारायचे. माझ्या वजनावरुन ते मला बोलायचे. त्यानंतर त्यांनी बरेच अपशब्द उच्चारले. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून हवे. मालिकेचे शूटींग थांबणार नाही. त्यांना गैरवर्तवणुकीमुळे काढण्यात आले आहे. गेले वर्षभर त्यांना याबद्दल समज देत आहेत,” असेही दिव्या म्हणाली.