बिग बींसह नागराज मंजुळेंचा 'झुंड' 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

नागराज मंजुळेंचे 'झुंड'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण

Updated: Feb 20, 2019, 12:11 PM IST
 बिग बींसह नागराज मंजुळेंचा 'झुंड' 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट 'सैराट'मधून घरांघरात पोहचलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे आता हिंदी चित्रपटातूनही दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांच्या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. अमिताभ बच्चन स्टारर आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' येत्या २० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

'झुंड'ची  निर्माता कंपनी 'टी-सीरीज'ने ट्विट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख निश्चित केली आहे. 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात ते नागपूरमधील खेळाचे सेवानिवृत्त शिक्षक, झोपडपट्टी भागात फुटबॉल सुरू करणारे विजय बारसे ही भूमिका साकारणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीने लोकांच्या मनात घर करणाऱ्या नागराज मंजुळे यांचा 'झुंड' काय कामगिरी करणारा, चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.