Naseeruddin Shah on Muslims: "मुस्लिम भारत लुटण्यासाठी आले नव्हते, त्यांना शिव्या....", नसरुद्दीन शाह यांचं मोठं विधान

Naseeruddin Shah on Muslims: बॉलिवूड अभिनेते नसरुद्धीन शाह (Naseeruddin Shah) सध्या ‘ताज: ड‍िवाइडेट बाई ब्‍लड’ (Taj: Divided by Blood) या वेब सीरिजमुळे (Web Series) चर्चेत आहेत. यादरम्यान त्यांनी सर्व मुस्लीम भारताला लुटण्यासाठी आले नव्हते असं सांगत नव्या पिढीला इतिहास समजवून सांगण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.   

Updated: Mar 1, 2023, 01:56 PM IST
Naseeruddin Shah on Muslims: "मुस्लिम भारत लुटण्यासाठी आले नव्हते, त्यांना शिव्या....", नसरुद्दीन शाह यांचं मोठं विधान title=

Naseeruddin Shah on Muslims: बॉलिवूड अभिनेते नसरुद्धीन शाह (Naseeruddin Shah) आपल्या बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. अनेक ज्वलंत विषयावर नसरुद्धीन शाह परखडपणे आपली मतं मांडत असतात, ज्यामुळे अनेकदा वादही निर्माण झाला आहे. त्यांनी अनेकदा केंद्र सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. त्यातच आता नसरुद्धीन शाह यांनी मुस्लिम (Muslim) आणि मुघल सम्राटांचा (Mughal Emperor) उल्लेख करत आणखी एक विधान केलं आहे. मुस्लीम भारताला लुटण्यासाठी आले नव्हते. आपल्या नव्या पिढीला ही गोष्ट समजली पाहिजे असं नसरुद्धीन शाह म्हणाले आहेत. 

नसरुद्धीन शाह सध्या आपल्या आगामी ‘ताज: ड‍िवाइडेट बाई ब्‍लड’ (Taj: Divided by Blood) या वेब सीरिजमुळे (Web Series) चर्चेत आहेत. या वेब सीरिजमध्ये नसरुद्धीन शाह अकबराची भूमिका निभावताना दिसणार आहेत. यानिमित्ताने नसरुद्दीन शाह यांनी अकबराबद्दल आपली मतं मांडली असून नाराजी जाहीर केली आहे. अकबराला नेहमीच हत्यारा म्हणून पाहण्यात आलं असून, हा त्याच्यावरील अन्याय आहे असं नसरुद्धीन शाह म्हणाले आहेत. 

अकबराला चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आलं

नसरुद्धीन शाह यांची आगामी वेब सीरिज ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मुघल सम्राटांचा इतिहास दर्शवला जाणार आहे. याआधीही अशा अनेक ऐतिहासिक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. पण ऐतिहासिक संदर्भ असले की अनेक वाद निर्माण होता. पद्मावत, बाजीराव मस्तानी, तानाजी अशा अनेक चित्रपटांच्या वेळी निर्माण झालेले वाद आपण पाहिले आहेत. त्यामुळे 'ताज' या नव्या वेब सीरिजवरुनही वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नसरुद्दीन शाह यांनी यावरही भाष्य केलं आहे. "आज राजकीय कारणांमुळे अकबरसारख्या पुरोगामी, ज्ञानी शासकाची तुलना नादिर शाह आणि महमूद यांच्याशी केली जाते. हा पूर्णपणे अन्याय आहे," असं परखड मत नसरुद्धीन शाह यांनी मांडलं आहे. 

"सर्व मुस्लिम लुटारु नव्हते"

"सर्व मुस्लिम भारताला लुटण्यासाठी आले नव्हते. आपल्या तरुण पिढीला हे माहिती असणं फार गरजेचं आहे. हे मुस्लिम भारताला आपलं घऱ बनवण्यासाठी आले होते. भूतकाळात अशा काही ऐतिहासिक घटना घडल्या असतील ज्यामुळे त्यांचा गौरव केला जात असेल. देश तयार करण्यात त्यांनी दिलेलं योगदान नाकारुन चालणार नाही. या योगदानामुळेच आपण एक राष्ट्र म्हणून उभे आहोत. जर आपल्याला त्यांचा गौरव करायचा नसेल, तर मग शिव्या देण्याचीही गरज नाही. उदाहरण द्यायचं झालं तर टिपू सुलतान आहे," असं नसरुद्धीन शाह यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान इतिहासावर आधारित प्रोजेक्ट करताना येणाऱ्या अडचणींवरही नसरुद्धीन शाह यांनी भाष्य केलं आहे. ऐतिहासिक संदर्भ असताना आपल्याला एखादी बाजू घ्यावी लागते, त्यामुळे हे थोडं अवघड असतं असं त्यांनी सांगितलं. आपण जेव्हा इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा काही वस्तुनिष्ठ नसतं. विजेत्यांनीच नेहमी इतिहास लिहिला असून आपल्याला त्यातूनच नेमकं सत्य काय आहे याची माहिती घ्यायची आहे असं नसरुद्धीन शाह यांनी सांगितलं.