मुंबई : बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पण, एकाएकी आयुष्याच्या या रंगमंचावरून एक्झिट घेणाऱ्या अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालं आहे. आत्महत्येपासून आजच्या दिवसापर्यंत दर क्षणाला या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. कारण आता, नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार मंगळवारी बिहार सरकारनं सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी शिफारस केली आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पोलीस महासंचालकांनी सुशांतच्या वडिलांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सीबीआय तपासाची मागणी केली. त्यामुळं आता आम्ही या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करत आहोत.'
दरम्यान, सीबीआय तपासाची मागणी होत असतानाच दुसरीकडे बिहार पोलिसांकडून सुशांतचा मित्र आणि क्रिएटीव्ह कंटेंट मॅनेजर सिद्धार्थ पिथलानीचा जबाब नोंदवला आहे. याव्यतिरिक्त सुशांतचे मॅनेजर दिपेश सावंत आणि इतर दहाजणांचा जबाब बिहार पोलिसांनी नोंदवला आहे.
सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी पुढील कारवाईसाठी मुंबई गाठली होती. सध्या या प्रकरणीच्या तपासामध्ये अनेक राजकीय पक्षांनीही उडी घेतली असून, एका वेगळ्याच राजकारणंही डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.