मुंबई : सुशांतच्या शरीरात विषाचा अंश सापडला नाही, एम्सनं ऑटोप्सी, व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल सीबीआयकडे सोपवला. सुशांतची हत्या की आत्महत्या लवकरच उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांत मृत्यूप्रकरणातला आपला ऑटोप्सी आणि व्हिसेराचा फॉरेन्सिक अहवाल सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. या एम्सच्या अहवालात सुशांतच्या व्हिसेरात विषाचे कोणतेही अंश आढळले नसल्याचं म्हटलंय.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना क्लीन चीट दिली नसल्याचंही समोर येतं आहे. कूपर रुग्णालयाच्या रिपोर्टला विस्तारीत रुपात पाहण्याची गरज आहे. त्यामुळे तुर्तास रुग्णालयाला क्लीन चिट मिळालेली नाही. कूपर रुग्णालयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते. एम्सचा रिपोर्ट हा इशार करत आहे की, कूपर रुग्णालयाकडून सुशांत प्रकरणात निष्काळजीपणा करण्यात आला. कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सने सुशांतची ऑटोप्सी केली. ज्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. सुशांतच्या गळ्यावरील निशाणाबाबत रिपोर्टमध्ये काहीच म्हटलेलं नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या मृत्यूच्या वेळेची देखील नोंद करण्यात आलेली नाही.
जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ सीबीआयने सुशांत मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र अद्याप निष्कर्षाप्रती आलेली नाही. त्यामुळे आता एम्सने दिलेल्या फॉरेन्सिक अहवाल आणि सीबीआयने केलेला आतापर्यंतचा तपास हे मिळतं जुळतं आहे का याची पडताळणी करून आपला निष्कर्ष सीबीआय काढण्याची शक्यता आहे.