मुंबई : अमुक एका चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळणं ही जितकी महत्त्वाची बाब आहे, तितकंच त्या पुरस्कारांच्या शर्यतीत चित्रपटाने स्थान मिळवणं हीसुद्धा अत्यंत मोठी आणि तितकीच महत्त्वाची बाब आहे. जिद्द, चिकाटी आणि समर्पकतेच्या बळावर अद्वितीय अशा कलेचा नमुना सादर करणाऱ्या कलाकारांचा ऑस्कर पुरस्काराने गौरव केला जाणं हे एक प्रमाणच जणू. अशा या ९२व्या Oscars2020 ऑस्कर पुस्कार सोहळ्याचा मुख्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारासाठी नामांकनप्राप्त चित्रपटांची नावं जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये जोकर, पॅरासाईट, वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड या चित्रपटांना पुरस्कारांसाठीचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आता कोणाच्या वाट्याला कोणता ऑस्कर जाणार हे, काही दिवसांनी उलगडणार आहेत. तिथे परदेशात या पुरस्कारांसाठीची तयारीही शेवटच्या टप्प्यात आली असेल. पण, तुम्हाला माहितीये का या अनन्यसाधारण महत्त्वाच्या अशा पुरस्कारांसाठी चित्रपटांची निवड कशी होते?
चला तर मग आढावा घेऊया याच निवड प्रक्रियेचा....
'द अकॅडमी'चे जगभरात जवळपास ६३०० सदस्य आहेत. ज्यामध्ये ५० भारतीय सदस्यांचाही समावेश आहे. यात अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळतो. बरं, ही मतं मिळवण्याची प्रक्रियाही तितकीच रंजक असते. कारण, प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो. त्यासाठी एक एजंट नेमावा लागतो. पुढे चित्रपटाबरोबरच जागतिक मुल्यही असावी लागतात. हा सर्व फिल्म मॅनेजमेन्ट म्हणजेच चित्रपट व्यवस्थापनाचा एक भाग.
भारतीय चित्रपट अनेकदा ऑस्करच्या शर्यतीत पोहोचतात खरे. पण, सुरुवातीच्याच सत्रांमध्ये ते बाहेरही पडतात. कारण, आपण याच फिल्म मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी कमी पडतो. ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास, ऑस्करच्या शर्यतती स्थान मिळालेला रणबीर सिंग स्टारर 'गली बॉय'.
फार आधी, भारतातून मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे' (१९८९), आशुतोष गोवारीकरांचा 'लगान' (२००१) मेहबुब खानचा 'मदर इंडिया' (१९५७) या चित्रपटांना फॉरेन फिल्म या विभागात नामांकन मिळालं होतं. पण ते काही यशस्वी ठरले नाहीत. त्याच तुलनेत बोस्निया या छोट्या देशातील 'नो मॅन्स लँड' या चित्रपटाने संपादन केलेलं ऑस्करमधील यश प्रशंसनीय.
प्राथमिक पातळीवर निवड झालेल्या १० चित्रपटांना पुढे नॉमिनेशनसाठी पाठवण्यात येतं. तेव्हा हे सर्व सदस्य ते चित्रपट पाहून त्याविषयी आपली मतं देतात. ही सर्व प्रक्रिया पाहता ऑस्कर पुरस्कार मिळवला म्हणजेच चांगला चित्रपट साकारण्यात यश मिळालं ही मानसिकता बदलण्याची गरज आहे हे खरं. कारण, इथे स्पर्धेत जास्त मतं ज्याच्याकडे तोच चित्रपट अग्रस्थानी असं हे साधं सोप गणितच सर्व काही ठरवून जातं.