close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आणखी एका कारणामुळे प्रियांकाचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात

... यावर प्रियांका आणि निक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Updated: Dec 4, 2018, 09:18 AM IST
आणखी एका कारणामुळे प्रियांकाचा विवाहसोहळा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध झाले, ज्यानंतर ही जोडी माध्यमांसमोर आली. सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण, 'देसी गर्ल'ने राजेशाही थाटात केलेलं हे लग्न आता वाद्याच्या भोवऱ्यात अडकलं आहे. 

प्राणीमात्रांसाठी कार्यरत असणाऱ्या PETA या संस्थेकडून प्रियांकाच्या लग्नात हत्ती आणि घोडे यांचा वापर केल्यासंबंधी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. PETA इंडियाकडून एक ट्विट करत एका लक्षवेधी आणि सूचक व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास आणण्यात आली. 

प्रियांकाच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर झाल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत, 'हल्ली अनेकजण जनावरांच्या पाठीवर बसून करण्यात येणारी सफारीही नाकारतात, लग्नसोहळ्यांमध्येही घोड्यांचा वापर टाळतात. तुम्हाला या खास दिवसाचा अपार आनंद असेल; पण प्राणीमात्रांसाठी आजचा हा दिवस नक्कीच चांगला नाही', असं PETAकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं. 

प्रियांका आणि निक या दोघांचंही ट्विटर हँडल PETA इंडियाच्या ट्विटमद्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्यावर 'निक्यांका' काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

पेटाकडून निराशा व्यक्त होण्यापूर्वी 'देसी गर्ल'चा विवाहसोहळा आणखी एका कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. एकिकडे फटाके वाजवू नका, वायू प्रदूषण करु नका असं म्हणणाऱ्या प्रियांकाने स्वत:च्या लग्नसोहळ्याची ग्वाही देण्याकरता मात्र आतिषबाजीला प्राधान्य दिलं. ज्यामुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला होता.