नवी दिल्ली : भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पद्मावत’ सिनेमाचे निर्माते काही राज्यांमध्ये या सिनेमावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले आहेत. सेन्सॉर बोर्ड द्वारे देण्यात आलेल्या तारखेनुसार हा सिनेमा २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदीसहीत तमिळ आणि तेलगु भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. ‘पद्मावत’ आयमॅक्स थ्रीडीमध्ये रिलीज होणारा पहिला भारतीय सिनेमा आहे.
सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत हा चित्रपटाला सेंसर बोर्डातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पद्मावत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तरीही देखील चित्रपटामागील शुल्ककाष्ट काही संपले नाही. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
राजस्थानातील धोलपूरमध्ये करणी सेनेच्या समर्थकांनी पद्मावतला जबरदस्त विरोध केला. करणी सेनेचे मुख्य लोकेंद्र सिंह कल्वी यांनी सांगितले की, हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर बॅन करण्यात यावा. मी पुन्हा पुन्हा देशाच्या पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच सांगेन की त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्या.