महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये आपल्या डान्सच्या कार्यक्रमांमुळे चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यामधील मोडनिंब कला केंद्रामध्ये बुधवारी पार पडलेल्या तमाशा कलाकारांच्या मेळाव्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अगदी डीजेपासून ते लहान मुलांना नाचवण्यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून अप्रत्यक्षपणे गौतमीच्या कार्यक्रमांवरुन तक्रार करण्यात आल्यानंतर हे निर्णय घेतल्याचं समजतं.
यापुढे तमाशा केंद्रामध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचा कलाकार म्हणून सहभाग करुन घेतला जाणार नाही असं तमाशा कलाकार, कला केंद्र मालक आणि तमाशाशी संबंधित कलाकारांच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. 18 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या मुली या सुजाण असतात. 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना चांगल्या-वाईटाची पारख असते. त्यामुळेच मुलींच्या शिक्षण आणि व्यक्तीमत्व विकासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं तमाशा कलाकारांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर गौतमीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये ती लहान मुलांना पाहून इशारा करताना दिसते.
लहान मुलांच्या गालावर किस
अनेकदा स्टेजवर डान्स करताना गौतमीने लहान मुलांच्या गालावर किस केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यासंदर्भात अनेकदा टीका करण्यात आली आहे. अनेकांनी यावरुन चिंताही व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केलेली. गौतमीचे डान्स करतानाचे हावभावही अनेकदा अश्लीलतेकडे झुकणारे असतात असेही आरोप होतात. त्यामुळेच तमाशा कलाकारांनी आता मुलांना स्टेजच्या आसपास फिरकण्याचे मार्गच नव्या नियमांच्या माध्यमातून बंद केले आहेत.
तसेच तमाशाच्या फडामध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तमाशी ही पारंपारिक कला आहे. याचा वापर काहींनी तमाशाच्या कलेला कलंक लावण्यासाठी केल्याचं या कलाकारांनी म्हटलं आहे. तमाशाचं पावित्र्य जपून ठेवण्यासाठी डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गौतमीने डीजेबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कलेची अखंडता राखणे महत्त्वाचे आहे, असं गौतमीने सांगितलं.
गौतमीचे हावभावही अनेकदा वादाचा विषय ठरतात. मध्यंतरी तिने स्टेजवर केलेले काही डान्स अश्लील असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच अन्य एका प्रकरणामध्ये तिच्याविरोधात आयोजकानेच गुन्हा दाखल केलेला.