मुंबई : प्रत्येक गावात एक चौक असतो. गावातील अनेक गोष्टींचा, घटनांचा, नात्यांचा तो चौक साक्षीदार असतो. असाच जिवाभावाची मैत्री, राजकारण यावर भाष्य करणारा ‘चौक’ चित्रपटाचा प्रिमियर प्रेक्षकांना या रविवारी म्हणजेच १२ मे रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीजवर पाहता येणार आहे. या अॅक्शन ड्रामाने परिपूर्ण चित्रपटात अभिनेता किरण गायकवाड पहिल्यांदाच कधीही न पाहिलेल्या एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. देवेंद्र गायकवाड यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले असून प्रवीण तरडे ,किरण गायकवाड, संस्कृती बालगुडे, उपेंद्र लिमये, अक्षय टांगसाळे , अरित्र गायकवाड, स्नेहल तरडे अशा तगड्या स्टारकास्टची फौज चित्रपटात पाहायला मिळेल.
झी टॉकीज वर आजपर्यंत अनेक मराठी सिनेमांचे प्रीमियर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आणि झी टॉकीज वाहिनी हे समीकरण प्रेक्षकांच्या आवडीचे बनले आहे. मे महिन्याची सुट्टी, आंब्याचा सिझन आणि त्यात मनोरंजनाने खचाखच भरलेल्या चौक या सिनेमाचा प्रीमियर म्हणजे सिनेमाप्रेमींसाठी झी टॉकीजकडून भर उन्हाळ्यात मिळालेली गारेगार ट्रिटच म्हणता येईल.
प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना थिएटर मध्ये खेचून आणण्यात बाजी मारली होती. तरुणाई ,राजकारण, वाद ,सुडाची भावना हे विषय या सिनेमात प्रभावीपणे मांडले आहेत. प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांचे दमदार आणि अर्थपूर्ण संवाद ही देखील या सिनेमाची वेगळी ओळख म्हणता येईल. गेल्या काही वर्षात मराठी सिनेमात सामाजिक, वास्तववादी कथा साकारल्या जात आहेत. त्यात चौक या सिनेमाचा उल्लेख करता येईल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना सिनेमाच्या कथेत कैद करत प्रेक्षकांची जागृती करणारा चौक हा सिनेमा झी टॉकीजवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरसाठी सज्ज आहे.
झी टॉकीज वाहिनीचे प्रेक्षक नेहमीच रविवारची उत्सुकतेने वाट पाहत असतात. कारण सिनेमाप्रेमी प्रेक्षकांसाठी झी टॉकीज वाहिनी मनोरंजनाचा खजिना घेऊन येत असते .बरेचदा असे होते की एखादा चांगला सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून जातो आणि प्रेक्षकांची संधी हुकते. पण झी टॉकीज वाहिनी प्रेक्षकांपर्यंत असे सिनेमे पोहोचवण्यासाठी टीव्ही प्रीमियर प्रदर्शित करत असते. रविवारी १२ मे रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा चित्रपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे . त्यामुळे प्रेक्षकांचा हा रविवार टॉकीज वाहिनीच्या "चौक "मध्ये रंगणार हे नक्की.