नवी दिल्ली : सुपरस्टार रजनिकांत गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ब्लड प्रेशरमध्ये चढउतार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. रूग्णालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान ते रुग्णालयात असताना त्यांच्या कुटुंबाकडून आणि चाहत्यांकडून सतत चिंता व्यक्त केली जात होती. शिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री के.पालानीस्वामी यांनी देखील फोनवरून रजनिकांत यांच्या प्रकृतीविषयी दखल घेतली.
रूग्णालयाने दिलेल्यामाहितीनुसार आता त्यांचा ब्लडप्रेशर नियंत्रणात आहे. शिवाय त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
रजनीकांत त्यांच्या आगामी 'अन्नाथे' चित्रपटाच्या शुटिंगसाठी हैदराबादमध्ये आहेत. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सेटवर ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांनी स्वतःला क्वारंटाइन देखील केलं होतं. सध्या चित्रपटाची शुटिंग थांबवण्यात आली आहे.