रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण

Rajinikanth : रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वयातील अंतर पाहता यूजर्सना रजनीकांतच्या पायाला हात लावणे योग्य वाटले नाही. त्यामुळे युजर्सनी रजनीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आकाश नेटके | Updated: Aug 22, 2023, 08:40 AM IST
रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण  title=

देशभरात सध्या रजनीकांत (Actor Rajinikanth) यांच्या जेलर (Jailer) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा 'जेलर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दुसरीकडे, रजनीकांत यांनी नुकतीच उत्तर प्रदेशला (UP) भेट दिल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. रजनीकांत त्यांच्या 'जेलर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊला पोहोचले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती. एवढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पायाला स्पर्शही केला. जेव्हा याचे फोटो समोर आले तेव्हा लोकांना रजनीकांत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र आता रजनीकांत यांनी त्यांच्या कृतीबाबत भाष्य केले आहे.

सोशल मीडियावर ट्रोल केले जात असताना रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श करण्यामागचे कारण सांगितले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पायांना स्पर्श केल्यामुळे रजनीकांत यांना खूप ट्रोल करण्यात आले. दोघांमधील वयातील अंतर पाहता युजर्सनी रजनीकांतने त्यांच्या पायाला हात लावायला नको होता असं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री योगी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाला हात लावायला नको होता, असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच रजनीकांत चेन्नई विमानतळावर दिसले होते, तिथे पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

याला उत्तर देताना रजनीकांत यांनी सांगितले की, ही त्यांची एक सवय आहे. "हो, ते माझ्यापेक्षा लहान आहेत. पण, ही माझी सवय आहे. जेव्हा माझ्यासमोर एखादा साधू किंवा योगी येतो, तेव्हा मी त्यांच्या पायांना नक्कीच स्पर्श करतो," असे रजनीकांत यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतल्यानंतर आणि चित्रपट हिट ठरल्यानंतर रजनीकांत पत्नी लता रजनीकांत यांच्यासोबत चारधाम यात्रेला गेले होते. बद्रीनाथचे दर्शन घेतल्यानंतर रजनीकांत थेट लखनऊला पोहोचले. आधी त्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली. यावेळी रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंगही ठेवण्यात आले होते. यानंतर रजनीकांत थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले. 

याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये रजनीकांत आपल्या कारमधून खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्री योगींना भेटले आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. योगी यांनी रजनीकांत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना घरात नेले. यावेळी रजनीकांत यांच्यासोबत त्यांची पत्नी लता यासुद्धा उपस्थित होत्या.