मुंबई : यंदाच्या ऑस्करमध्ये भारताकडून बाहुबली-2ला पाठवण्यात आलं नाही. ऑस्करच्या रेसमध्ये बाहुबली-2ला एन्ट्री देण्यात आली नाही, त्यामुळे आपण निराश नसल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली म्हणाले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि टीमला पैसा कमवून देणं हेच आपलं लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया राजमौली यांनी दिली आहे.
चित्रपट बनवताना मी पुरस्काराबाबत विचार करत नाही. पहिले चित्रपटाच्या स्टोरीबाबत मी समाधानी असेन तरच मी पुढे जातो. मग जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचून, ज्यांनी चित्रपटासाठी मेहनत घेतली त्यांच्यासाठी पैसे कमावणं महत्त्वाचं आहे, असं राजमौली म्हणालेत.
राजमौली यांच्या बाहुबलीनं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटानं ९०० कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन, तमन्ना भाटीया आणि सत्यराज मुख्य भूमिकेत होते.
ऑस्करसाठी भारताकडून न्यूटन हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. न्यूटन आणि बाहुबली या दोन चित्रपटांमध्ये ऑस्करवारीसाठी स्पर्धा होती. पण भारतातल्या निवडणूक प्रक्रियेवर आधारित असलेल्या न्यूटन चित्रपटाला ऑस्करमध्ये एन्ट्री मिळाली.