रसिका म्हणतेय पुन्हा शनाया साकारताना आनंद होतोय

पहिली 'शनाया' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: Jul 8, 2020, 09:22 AM IST
रसिका म्हणतेय पुन्हा शनाया साकारताना आनंद होतोय

मुंबई : लॉकडाऊननंतर साडेतीन महिन्यांनी पुन्हा एकदा 'झी मराठी'वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांना सुखद धक्का मिळणार आहे. कारण रसिका सुनील पुन्हा एकदा शनाया म्हणूनच मालिकेमध्ये एन्ट्री घेते आहे. या बाबत बोलताना रसिका म्हणाली की, मी भूमिका सोडल्यावर मध्ये दोन वर्ष गेली आहेत असं सेटवर जाणवलंच नाही. शनाया साकारताना ज्या जुन्या गोष्टी लक्षात घेऊन जसं पूर्वी काम करायचे तसंच काम आता करतेय. संपूर्ण टीमशी आधीपासूनच बाँडिंग असल्यामुळे काही अवघड गेलं नाही. या भूमिकेसाठी मला पुन्हा विचारणा झाल्यावर अगदी सुहाग मी ती स्वीकारली. लॉकडाउनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येताना आनंद होतोय.' 

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे नवीन भाग १३ जुलै पासून रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आता लॉकडाऊननंतर नव्या, फ्रेश एपिसोडसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबतच प्रेक्षकांसाठी हे खास सरप्राईज असणार आहे.

रसिका सुनील सुरुवातीला 'शनाया'ची भूमिका साकारत होती. रसिकाने 'शनाया' भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. मधल्या काही काळात रसिका आपल्या शिक्षणाकरता परदेशात गेली असता ही भूमिका अभिनेत्री ईशा केसकर साकारत होती. पण ईशा केसकरची तब्बेत बिघडली असल्यामुळे तिला मालिकेचं शुटिंग करणं शक्य होणार नव्हतं. तिच्या या खासगी कारणामुळे आता ती मालिकेत दिसणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रसिका सुनील 'शनाया'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.