पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत - अपूर्वा नेमळेकर

पम्मी ही शेवंतापेक्षा किती वेगळी आहे?

Updated: Oct 28, 2020, 12:33 PM IST
पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत - अपूर्वा नेमळेकर

मुंबई : टेलिव्हिजन वरील तिच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक आणि चाहते सुखावले आहेत. ती म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा झी युवावरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हि मालिका ४ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षक पाहू शकतील. प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे ती म्हणजे अपूर्वाच्या पम्मी या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घ्यायची, याच निमित्ताने अपूर्वासोबत साधलेला हा खास संवाद

१. पम्मी या तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग

- तुझं माझं जमतंय या मालिकेत मी पम्मीची व्यक्तिरेखा साकारतेय. तिचं खरं नाव हे प्रमिला आहे आणि ती एक महत्वाकांक्षी अभिनेत्री आहे. अभिनेत्री होण्यासाठी तिची धडपड चालू आहे. ती खूप श्रीमंत असून एक ना एक दिवस तिच्या वाट्याला एक चांगली भूमिका येईल अशी आशा मनात धरून ती सदैव अप टू डेट असते. तिला नटण्याची खूप आवड आहे. थोडी विनोदी व्यक्तिरेखा आहे. झेंडू नावाची तिची एक चेली आहे जी सतत तिच्यासोबत असते. अंकशास्त्र पम्मी खूप मानते आणि म्हणूनच तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तिने ट्रिपल एम लावला आहे आणि तो टॅटू तिच्या पाठीवर आहे. अशी आहे तुझं माझं जमतंय या मालिकेत मी साकारत असलेली पम्मी.

२. मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर तुला प्रेक्षकांनाकडून काय प्रतिक्रिया मिळाली?

- रात्रीस खेळ चाले संपल्यावर अनेक प्रेक्षकांची अशी अपेक्षा होती कि मी पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमाकडे वळावं. एक छान व्यक्तिरेखेसोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस यावं. मी सुद्धा एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होती, जेव्हा माझ्या वाट्याला तुझं माझं जमतंय हि मालिका आली आणि जेव्हा या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला त्यानंतर मला बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया मला आला. सगळ्यांना प्रोमो खूप आवडला. त्या प्रोमोमध्ये शेवंताचा उल्लेख होतो आणि त्यानंतर पम्मीला पाहून सगळ्यांमध्येच उत्सुकता निर्माण झाली कि नक्की हि व्यक्तिरेखा काय असणार आहे? पण हिरो हिरोईन आणि मला प्रोमोच्या शेवटला एकत्र पाहून हि दोघात तिसरी तर नाही? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील मला मिळाल्या.

३. पम्मी ही शेवंतापेक्षा किती वेगळी आहे?

- पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत. कारण शेवंता या व्यक्तिरेखेचं एक उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी नाईक कुटुंबाला तिच्या तालावर नाचवत होती. पण पम्मी हि एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. तिच्या पासून कोणालाच धोका नाहीये. पम्मी हि तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते. शेवंता तशी नव्हती. शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये, पम्मी खूप श्रीमंत आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा दुबईमध्ये असतो. तिच्या कडे सर्व काही आहे. ती अभिनय क्षेत्रात लवकरच खूप मोठं नाव करणार आहे असं तिला वाटतं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणणार आहे.

४. प्रोमो रिलीज झाल्यावर बऱ्याच लोकांनी तुला ट्रोल केलं, त्यावर तुझी प्रतिक्रिया काय होती?

- प्रोमो रिलीज झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला ट्रोल केलं कि दोघात तिसरीचीच भूमिका तुला का मिळते? मी अशा कॉमेंट्सकडे जास्त लक्ष देत नाही. पण मला कुठेतरी वाटलं कि माझी व्यक्तिरेखा लोकांना अजून अस्पष्ट आहे आणि म्हणून मी त्यावर उत्तर दिल कि अजून एक हि एपिसोड प्रदर्शित झाला नाहीये त्यामुळे आधीच तर्क लावू नका. पम्मी हि दोघात तिसरी व्यक्तिरेखा नाही आहे. जशी मालिका येईल तशी प्रेक्षकांना माझी व्यक्तिरेखा कळेल.

५. नगरमध्ये शूट करतानाचा अनुभव कसा आहे?

- आम्ही हि मालिका नगरमध्ये शूट करतोय. मी मुंबईची आहे. मुंबईच तापमान खूप असतं. पण नगरबद्दल सांगायचं झालं तर इथे वातावरण खूप उत्तम आहे, इकडे खूप रिफ्रेशिंग वाटतं. इथे खाण्याची खूप चंगळ आहे कारण इथलं जेवण देखील खूप उत्तम आहे. फक्त इकडच्या रस्त्यांवर ड्राईव्ह करताना मला थोडा त्रास होतो. 

६.आम्हाला बिहाइंड द सिन काय गमतीजमती घडतात त्या सांग

- हि मालिका शूट करताना मला खूप मजा येतेय. सेटवरचा जो क्रू आहे तो मला अजून पण शेवंता या नावानेच हाक मारतो. त्यामुळे मी त्यांना गमतीत अशी ताकीद दिली आहे कि मला शेवंता नावाने हाक मारली तर मी उत्तरच नाही देणार. तसंच पम्मी हि व्यक्तिरेखा खूप नाटकी आहे, त्यामुळे तिचे सीन्स शूट करताना मी सेटवर देखील खूप गम्मत करते जेणेकरून संपूर्ण युनिट हसत असतं. अशाच गमती जमती ऑफ-कॅमेरा घडत असतात. हे एपिसोड्स जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा त्यांना देखील या व्यक्तिरेखेला बघताना खूप मजा येईल.