मुंबई : ७० आणि ८० च्या दशकातील तरुणांच्या हृदयाची धडधड बनलेल्या दिवंगत अभिनेता विनोद मेहरा यांचा आज ७४ वा जन्मदिवस... हिंदी सिनेमसृष्टीत विनोद मेहरा यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख बनवली होती. विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहीट सिनेमा दिले. पण त्यांची जोडी लोकांच्या पसंतीस उतरली ती अभिनेत्री रेखासोबत... मात्र, ही गोष्ट जेव्हा विनोद यांच्या आईला समजली तेव्हा त्यांनी विनोद मेहरा यांना घराबाहेर काढलं होतं.
समोर आलेल्या मीडिया रिपोर्टसनुसार, विनोद मेहरा यांनी अभिनेत्री रेखा यांच्यासोबत गुपचूपपणे विवाह केला होता. परंतु, या गोष्टीला आजपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, विनोद मेहरा जेव्हा रेखा यांना घेऊन आपल्या घरी दाखल झाले तेव्हा त्यांना आईकडून चप्पलेचा मारही खावा लागला.
'घर' या सिनेमाचं शुटींग सुरू असताना रेखा आणि विनोद यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु, विनोद मेहरा यांच्या आईच्या नकारामुळे हे नातं दीर्घकाळ टीकू शकलं नाही.
विनोद मेहरा यांनी १९५८ साली आलेल्या 'रागिनी' या सिनेमातून बालकलाकार म्हणून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर आणखी काही भूमिका निभावल्यानंतर १९७१ मध्ये 'एक थी रीटा'मध्ये अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या करिअरला नवं वळणं दिलं.
विनोद मेहरा यांनी नागिन, जानी दुश्मन, घर, ऐलान, स्वर्ग नर्क, कर्तव्य, एक ही रास्ता, जुर्माना अशा अनेक सिनेमांत काम केलं. अनुरोध, बेमिसाल आणि दीप यांसारख्या अनेक सिनेमांसाठी विनोद मेहरा यांना फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून नॉमिनेट करण्यात आलं.
विनोद मेहरा यांचं खाजगी जीवन मात्र चढ-उतारांचं राहीलं. त्यांनी तीन विवाह केले होते. मीना ब्रोका आणि बिंदिया गोस्मी यांच्याशी घटस्फोटानंतर त्यांच्या तारा अभिनेत्री रेखाशी जुळल्या होत्या. परंतु, सिमी ग्रेवाल यांच्या एका कार्यक्रमात बोलताना रेखा यांनी मात्र या गोष्टीला नकार दिला होता. आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो आणि आमचं कधीही लग्न झालं नव्हतं, असं त्यांनी या चॅट शोमध्ये म्हटलं होतं.
१९८८ मध्ये विनोद मेहरा यांनी केनियातील एका व्यावसायिकाची मुलगी असलेल्या किरण हिच्याशी विवाह केला होता. किरण आणि विनोद या जोडप्याला दोन मुलं - रोहन आणि सोनिया - आहेत.
दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विनोद यांनी १९९० मध्ये 'गुरुदेव' या सिनेमाला सुरुवात केली होती. परंतु, १९९० मध्येच हृदयविकाराच्या धक्क्यामुळे विनोद मेहरा यांचा मृत्यू झाला. अवघ्या ४५ व्या वर्षी विनोद मेहरा यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर दिग्दर्शक राज सिप्पी यांनी हा सिनेमा पूर्ण करून १९९३ मध्ये प्रदर्शित केला.