मुंबई : आपण प्रेम करत असणाऱ्या व्यक्तीला तितक्याच धाडसानं प्रेमाची कबुली देणं हे कितीही सोपं वाटत असलं तरीही ते तितकंसं सोपं नाही. प्रेमात पडलेल्या अनेकांनाच हे पटत असावं. प्रेम व्यक्त करण्यासाठी मनात प्रचंड धीटपणा एकवटत समोरच्या व्यक्तीसमोर जेव्हा भावना मांडल्या जातात तेव्हा रितेपणाची एक जाणीव मनाला स्पर्शून जाते.
आतापर्यंत मनाच साचलेल्या भावनांना वाट मिळाली याचीच ती अनुभूती असते. एका अभिनेत्रीवर आपलं प्रेम असल्याची अशीच ग्वाही, किंबहुना तिच्यावरील प्रेमाची कबुली तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं दिली होती.
अतिशय धक्कादायक अशाच मार्गानं प्रपोजल मिळालेली ही अभिनेत्री आहे अमृता राव आणि तिच्यावर प्रेम करणारा 'तो' होता, किंबहुना आहे आरजे अनमोल.
तर, झालं असं की रात्रीची वेळ होती... अनमोल त्याच्या रेडिओ शोच्या माध्यमातून लाईव्ह होता. अमृता चित्रीकरणाहून परतली होती. त्यावेळी ती अनमोलचाच रेडिओ शो ऐकत होती.
बऱ्याच दिवसांपासून तिच्या मनात होतं. पण, त्या दिवशी मेसेज केला तर हे जरा अतीच होईल असं तिला वाटलं. त्याचवेळी तिथे अनमोलच्या मोबाईलवर नोटीफिकेशन आलं. तो अमृताचा मेसेज होता... 'मी तुझा शो ऐकतेय.'
अमृताच्या या मेसेजवर, 'आणखी पाच मिनिटं हा शो ऐक...' असं अनमोलनं तिला रिप्लाय करत सांगितलं. काहीतरी गडबड आहे, याची कुणकुण अमृताला लागली. तिथे 'लोहा गरम है, मार दो हथोडा' या आत्मविश्वासानं अनमोलनंही पाऊल उचललं. त्यानं अमृताचं आवडतं गाणं चाँदनी राते सुरु केलं...
'आजच्या रात्री मी माझ्या मनातील भावना तिच्याकडे व्यक्त करणार आहे, जी मला आता ऐकतेय. तुझ्याही मनातच तेच असेल तर फक्त मला फोन कर', असं अनमोल म्हणाला आणि त्यानं अमृताला प्रपोज केलं.
तिथे संपूर्ण शहराच्या साक्षीनं आपल्याला अनमोलनं प्रपोज केलं यावर अमृताचा विश्वासत बसत नव्हता. आजही हे दोघं विवाहबंधनात अडकले असले तरीही तो क्षण आठवला की, प्रेमाच्या त्या दिवसांमध्येच रममाण होतात.
रेडिओच्या माध्यमातून जुळलेली या दोघांचीही फ्रिक्वेन्सी म्हणजे अनेकांसाठीच नवा कपल गोल. एका रेडिओ शोच्या निमित्तानं अनमोल आणि अमृताची प्रेमकहाणी, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास चाहत्यांपुढे अतिशय रंजक मार्गाने उलगडला जात आहे. त्यातच आलेलं हे प्रपोजचं वळण म्हणजे Cherry on the top....