मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी हिच्या गोदामात चोरांनी हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या जुहू येथील गोदामात चोरी झाली आहे. ९० हजारांची इमिटेशन ज्वेलरी तसेच गोदामातील दोन कपाटे व एक एसी चोरीला गेला आहे, तिच्या नोकरानेच ही चोरी केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमा मालिनीच्या जुहू येथील गोदामात संगीत, नाटय़ तसेच डान्स शेसाठी लागणारी इमिटेशन ज्वेलरी तसेच अन्य साहित्य आहे. याची काळजी घेण्यासाठी तिच्याकडे काम करणारा एक नोकर घेत असे. त्या नोकराने हेमामालिनीची फक्त इमिटेशन ज्वेलरीच चोरली नाही, तर दोन कपाटे व एक एसीदेखील चोरल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मंगळवारी हेमामालिनी हिची पीए गोदामात गेली असता चोरीचा प्रकार तिच्या लक्षात आला.