'बाहुबली'चा दिग्दर्शक एका दृश्याला मोजणार ४० कोटी

राजामौलींच्या नावे आणखी एक विक्रम; या अभिनेत्यांच्या एंट्रीसाठी मोजली कोट्य़वधींची रक्कम 

Updated: Jul 10, 2019, 03:13 PM IST
'बाहुबली'चा दिग्दर्शक एका दृश्याला मोजणार ४० कोटी title=

मुंबई : चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आणखी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटावर काम करत आहेत. 'बाहुबली' या अद्वितीय चित्रपटामुळे त्यांनी कोट्यवधी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. त्याआधी त्यांनी 'मागाधीरा' या चित्रपटातूनही आपल्या दिग्दर्शनाची ताकरद दाखवून दिली होती. आता य़ेत्या काळातही ते अशाच एका मोठ्य़ा चित्रपटाशी जोडले गेले आहेत. 

प्रदर्शनापूर्वीच राजामौलींच्या या चित्रपटाने विविध विक्रम प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही चर्चेत असणारा हा चित्रपट आहे, 'आरआरआर'. याच चित्रपटातील दोन दृश्यांसाठी राजामौली यांनी तब्बल ४० कोटी रुपये मोजण्याचं ठरवलं आहे. ही किंमत ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. 

स्वातंत्र्य सैनिक अल्लूरी सीताराम आणि कोमाराम भीम यांच्या संघर्षावर य़ा चित्रपटाचं कथानक आधारित आहे. चित्रपटात अल्लूरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण आणि कोमाराम भीम यांच्या भूमिकेत ज्युनियर एनटीआर झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगणही एका खास भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ज्यामध्ये राम चरण सोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी तिला मिळाली आहे. 

चित्रपटात राम चरणच्या एंट्रीसाठी जवळपास १५ कोटींचा खर्च आला आहे. तर, ज्युनियर एनटीआरच्या दृश्यासाठी त्यांनी तब्बल २५ कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. अवघ्या दोन दृश्यांसाठी त्यांनी मोजलेली ही रक्कम पाहता, चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज लावणं सहज शक्य होत आहे.  

आतापर्यत राजामौली यांनी त्यांच्या टीमसह हैदराबाद, गुजरात आणि पुणेमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचे कथानक देशाच्या स्वातंत्र पूर्व काळातील म्हणजेच १९२० या कालखंडातील आहे. अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांनी इंग्रजांविरोधात लढले होते. 'आरआरआर' हा चित्रपट पुढील वर्षी २० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यानंतर तो हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये ध्वनीमुद्रीत केला जाणार आहे.