मुंबई : सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली कथानकाला अनुसरुन काही दृश्य चित्रीत करण्यात येतात, पण, पुढे सेन्सॉरच्या तावडीत आल्यानंतर मात्र ही दृश्य अमूक एका चित्रपटातून वगळण्यात येतात किंवा काही स्तरांतून त्यांचा विरोध करण्यात येतो. कारण, ही असतात न्यूड दृश्य किंवा एखादं प्रणयदृश्य. याचविषयी लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या आणि 'सेक्रेड गेम्स' या अतिशय गाजलेल्या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्याने त्याचं ठाम मत मांडलं आहे.
न्यूडिटी असणारी दृश्यं पाहायचीच असतील तर प्रेक्षक पॉर्नोग्राफीला पसंती देतील,. वेब सीरिजचा आधार घेणार नाहीत, असं ठाम मत मांडणारा तो अभिनेता आहे पंकज त्रिपाठी. 'आयएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर त्याचं मत मांडलं.
'माझ्या मते प्रत्येक गोष्टीमागे एक उद्देश असतो. एखाद्या दृश्याच्या वगळल्या जाण्याने कथानक अपूर्ण राहत असेल तर ही विचार करण्याजोगी आणि तितकीच गंभीर बाब आहे. विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यप ही जबाबदार माणसं आहेत. ते उगाचच अतिरंजकपणा आणण्यासाठी एखाद्या दृश्याचा कलाकृतीत समावेश करणार नाहीत', असं पंकज म्हणाला. पॉर्नोग्राफी किंवा पॉर्न फिल्म्स या इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. मग, जर नग्न दृश्य किंवा न्यूडिटी पाहणं हाच त्यांचा हेतू असेल तर ते वेब सीरिजचा आधार का घेतील?, असा महत्त्वाचा प्रश्न पंकजने उपस्थित केला.
डिजिटल माध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या कलाकृतींवर सेन्स़ॉरची गदा येणार असल्याच्या शक्यतेविषयी प्रश्व निचारला असता पंकजने त्याचं ठाम मत मांडलं. पंकजने उपस्थित केलेला हा प्रश्न पाहता न्यूड दृश्य़ांवर आक्षेप दर्शवणाऱ्यांच्या ही चपराक आहे, असं म्हणायला हरकत नाही. पंकज येत्या काळात 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वात झळकणार आहे. या पर्वात त्याची भूमिका कथानकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि तितकीच रंजक असणार आहे.