मुंबई : सैराट सिनेमात लंगड्या हे पात्र साकारुन घरा-घरात पोहचलेला अभिनेता तानाजी गालगुंडे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सैराट सिनेमानंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. हे कारणही खूप चिंताजनक आहे. तानाजी संबधित एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे. ही बातमी त्याची हेल्थ अपडेट देणारं आहे.
तानाजी एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तानाजीला सोलापूरमधील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेता तानाजी गालगुंडेला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
सोलापूरच्या सिव्हील रुग्णालयातील डॉक्टर अमेय ठाकूर सध्या अभिनेता तानाजी गालगुंडेवर उपचार करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता तानाजी गालगुंडे यांच्यावर काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. उपचार केल्यानंतर अभिनेता तानाजी गालगुंडे लवकर बरा होईल, असे डॉक्टर अमेय ठाकूर यांनी सांगितलं आहे.
सैराटशिवाय अभिनेता तानाजी गालगुंडेने 'गस्त' आणि 'भिरकीट' या चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. तसंच अभिनेता तानाजी गालगुंडेने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'झुंड' या चित्रपटात भूमिका साकारली आहे. 'मन झालं बाजिंद' या मराठी मालिकेत देखील अभिनेता तानाजी गालगुंडेने महत्वाची भूमिका साकारली आहे.