जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय. या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.
१९९९साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंगवेळी काळवीटाची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये सलमान खान बरोबरच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम या अभिनेत्यांविरोधातही खटला चालला. पण या कलाकारांना संशयाचा फायदा मिळाला. या कलाकारांविरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली.
जोधपूरच्या जेलमध्ये सलमानला १०६ क्रमांक देण्यात आला आहे. सलमानला वॉर्ड क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आलं आहे. जेलमध्ये आणल्यावर सलमानच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या. या चाचण्यांमध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत.
सलमानला जेलमध्ये आणलं तेव्हा तो निराश होता. सलमानला जेलमध्ये कोणतीही व्हीआयपी वागणूक देण्यात येणार नाही, असं जोधपूरचे डीआयजी विक्रम सिंग यांनी सांगितलं. सलमानला दुसऱ्या कैद्यांप्रमाणेच ठेवलं जाईल. जेलमध्ये चोख सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सलमानला जेलचे कपडे उद्या देण्यात येणार आहे. सलमानला रात्रीचं जेवण देण्यात आलं पण त्यानं जेवायला नकार दिला, अशी माहिती विक्रम सिंग यांनी दिली आहे. जेलच्या भांड्यांमध्येच सलमानला जेवण देण्यात आलं होतं. सलमाननं जेलमध्ये कोणतीही मागणी केलेली नाही.