मुंबई : 'तरतीतो' वेबसिरीजच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या व्हायरस मराठीच्या 'तरतीतो' या वेब सिरीजमध्ये ते सध्या दिसून येत आहेत.
बाबा जेव्हा आई होऊन आपल्या मुलांचे संगोपन करून पूर्ण घराची जबाबदारी उचलतो तेव्हा नेमके काय घडते हे या वेब सिरीजमध्ये प्रेक्षकांना दिसून येते. या वेब सिरीजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.
"तरतीतो" ही ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या तरे कुटुंबाची ही गोष्ट आहे. बाप मनोहर तरे मुलगी क्षिती आणि मुलगा तोष सोबत ठाण्यात घोडबंदर रोडला राहत असून, बायको मात्र कामानिमित्त सांगलीला राहत आहे. त्यामुळे घरासोबत आपल्या कॉलेजवयीन मुलांची जबाबदारी ही मनोहर तरेंवर येऊन पडते. तेच मुलांचे बाबा आणि आई सुद्धा होतात.
अगदी किचनपासून धुणी-भांडी करण्यापर्यंतची कामं ते घरात करतात. अशी या वेब सिरीजची पार्श्वभूमी आहे. खूप मोठ्या काळानंतर समीर पाटील यांना अभिनय करताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
व्हायरस मराठीच्या गाजलेल्या 'तरतीतो' या शो चे ३ भाग युट्युबवर प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून चौथा भाग शुक्रवारी येत आहे. हलके फुलके पण तितकेच गोड संवाद आणि विनोदाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरवरून या भागात काय घडणार आहे याची किंचित कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल.
ऐन लोकडाऊनमध्ये, दोन पुरुष असलेल्या घरात एखाद्या मुलीला पाळी आली तर काय होते? ते ही परिस्थिती कशी हाताळतात? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. व्हायरस मराठीच्या या वेब सिरीज चे लेखन, मनाली काळे आणि चैतन्य सरदेशपांडे यांनी केले असून दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.
मनोहर तरेंची भूमिका,म्हणजे 'तर' ची भूमिका प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील बजावत असून, 'ती 'च्या म्हणजे,मुलीच्या भूमिकेत अंकिता देसाई आणि मुलाच्या, म्हणजे 'तो' च्या भूमिकेत सृजन देशपांडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.