'संगीत मानापमान' अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर, टीझर पोस्टर लाँच

'कट्यार काळजात घुसली' सिनेमानंतर दुसरं संगीत नाटक 

Updated: Apr 14, 2021, 02:49 PM IST
 'संगीत मानापमान' अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर, टीझर पोस्टर लाँच  title=

मुंबई : अजरामर संगीत नाटकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. संगीत नाटकांकडे मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष होतंय, अशी भीती अनेक कलाकारांनी व्यक्त केली. असं असताना अजरामर संगीत नाटक 'कट्यार काळजात घुसली' वर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला. यानंतर दुसरं 'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर 'मानापमान' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सुबोध भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'नमन नटवरा' सारखी नांदी या नाटकानं दिली तर 'नाही मी बोलत नाथा', 'चंद्रिका ही जणू', 'शुरा मी वंदिले', 'युवतीमना दारुण रण' अशी उत्तमोत्तम पदं नाटकात होती. या पदांनी रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. १९११ मध्ये हे नाटक रंगमंचावर आलं होतं, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता हे नाटक सिनेमाच्या रुपात येणार आहे. या सिनेमात कोण कोण कलाकार असणार याबाबत प्रेक्षकांनी कुतूहल आहे. 

'कट्यार काळजात घुसली' सिनेमातून सुबोध भावेने दिग्दर्शनात पदार्पण केलं. शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह 'सूर निरागस हो', 'अरुणि किरणी' अशी गाणी कट्यारमधून दिली होती. 'संगीत मानापमान' नाटकातील कोणती पदं सिनेमात येणार, नवी गाणी असणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 
"कट्यार काळजात घुसली" सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्याप्रमाणेच "मानापमान" या सिनेमाकडून प्रेक्षकांना अपेक्षा असतील. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'मानापमान' सिनेमाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिलं होतं, तर शिरीष गोपाळ देशपांडे या सिनेमाची पटकथा लिहित आहेत. नाटकाचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं, तर सिनेमाचं संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत.