'5 महिन्याच्या बाळाकडे लक्ष देता येत नाहीये,' सारा श्रवण भावूक

सहकलाकाराकडून खंडणी उकळल्याचा आरोप 

Updated: Dec 3, 2019, 12:17 PM IST
'5 महिन्याच्या बाळाकडे  लक्ष देता येत नाहीये,' सारा श्रवण भावूक

मुंबई : मराठी अभिनेत्री सारा श्रवणला Sara Shrawan सहकलाकाराकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दुबईतून अटक करण्यात आली होती. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात Pune Shivaji Nagar साराला हजर करण्यात आल्यानंतर तिला पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. जामिनावर सोडण्यात आलेल्या साराने फेसबुक लाईव्हकरून आपल्याला होणारा त्रास प्रेक्षकांसमोर मांडला आहे. 

"कोणत्याही कथाकथित गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. या साऱ्याचा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचं,' सांगितलं आहे. 'या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झाला आहे. जे खरं आहे, जे खोटं आहे ते कायद्याने जगासमोर येणार आहे. मी माझ्या 5 महिन्याच्या बाळाला नीट वेळही देऊ शकत नाही. मी आता सुखरूप आहे. माझ्या बाळासोबत घरी आहे,' असं देखील साराने सांगितलं आहे. (पुण्यात कास्टिंग काऊचची खोटी तक्रार, अभिनेत्रीला अटक)

दीड वर्षभरापूर्वी आलेल्या 'रोल नंबर १८' या सिनेमातील अभिनेता सुभाष यादववर कास्टिंग काऊच आणि विनयभंगाचे आरोप करुन त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप सारावर आगे. या प्रकरणी एक पोलीस अधिकाऱ्यासह तिघांना अगोदरच अटक झाली होती. 

'व्हॉट अबाऊट सावरकर', 'शिकारी', 'रंग हे प्रेमाचे... रंगीले' यासारख्या सिनेमांमधून आपण साराला पाहिलं आहे. तसेच 'देवयानी', 'पिंजरा', 'तू तिथे मी' या मालिकांमध्ये साराने काम केलं आहे.  ‘रोल नंबर १८’ या सिनेमातील अभिनेता सुभाष यादव विरोधात कटकारस्थान करुन त्याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी साराला पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र यादरम्यान तिला न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही.