अर्जुन- क्रिती मराठी शिकायला जातात तेव्हा....

क्रिती ऐवजी कृती म्हणताच ती अशी काही व्यक्त झाली की.... 

Updated: Dec 3, 2019, 11:52 AM IST
अर्जुन- क्रिती मराठी शिकायला जातात तेव्हा....
छाया सौजन्य- भाडिपा

मुंबई : ऐतिहासिक घटनांवर आधारित 'पानिपत' हा चित्रपच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. याच धर्तीवर या चित्रपटातील कलाकार शक्य त्या सर्व परिंनी कलात्मकपणे चित्रपटाची प्रसिद्धी करत आहेत. याच प्रसिद्धीच्या सत्रात चित्रपटात झळकणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांची एक वेगळी झलक पाहायला मिळाली. 

भारतीय डिजीटल पार्टी अर्थात 'भाडिपा'च्या एका खास व्हिडिओमध्ये क्रिती आणि अर्जुन मराठीचे धडे गिरवताना दिसत आहेत. यामध्ये त्यांचा अंदाज पाहता मराठीप्रती असणारी त्यांची उत्सुकता दाद देण्याजोगी आहे. पेशवेकालीन प्रसंग आणि काळ उभा करण्यासाठी या कलाकारांनी 'पानिपत' हा चित्रपट साकारतेवेळी बरीच मेहनत घेतली होती. पण, तरीही अस्खलित मराठी मात्र त्यांना काही जमलेलं नाही. 

अस्खलित मराठी शिकण्यासाठी शोधात निघालेल्या या दोघांनाही मराठी शिकवण्याची जबाबदारी घेतली आहे ती म्हणजे भाडिपने. याची सुरुवात होते आहे ती म्हणजे मराठी माणसांच्या लक्षणापासून. एक मराठी माणूस हा अनेकदा त्याच्या कृतीतून ओळखला जातो. ही कृती मग त्याचं मराठीपण सिद्ध करण्यास जबाबदार असते. त्यातीलच एक म्हणजे कमालीचा आत्मविश्वास. 

आत्मविश्वासाच्या बळावर ठणकावून आपलं मतप्रदर्शन करणाऱ्या मराठी माणसाप्रमाणेच आत्मविश्वासाने आपलं नाव कृती नसून क्रिती आहे, हे सांगणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्रीला पाहिलं की अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू उमटतं. आता या मराठीच्या तासाला क्रिती आणि अर्जुनने नेमकी काय आणि किती धमाल केली हे तुम्ही पाहाच. 

सध्या 'पानिपत' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्येच सर्व कलाकार व्यग्र आहेत. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. मराठ्यांच्या इतिहासात बरंच महत्त्व असणाऱ्या 'पानिपत'च्या लढाईवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.