Satish Kaushik Death Reason: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या निधनामुळे बॉलिवूडला (Bollywood) धक्का बसला आहे. सतीश कौशिक अगदी ठणठणीत असताना अचानक त्यांचं निधन झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. दरम्यान, संपूर्ण घटनाक्रम पाहता दिल्ली पोलीस मृत्यूचं नेमकं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलीस (Delhi Police) यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या निधनाची दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत. अद्याप तरी पोलिसांना यामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही.
सतीश कौशिक बुधवारी रात्री दिल्लीमधील आपल्या मित्राच्या घरी होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी आपल्या चालकाला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. गुडगामधील फोर्टिज रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं. पण रस्त्यातच त्यांनी आपला जीव गमावला होता.
दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांनी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "सतीश कौशिक यांच्या शरिरावर जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत. प्राथमिक अहवालात ह्रदय बंद पडल्यानेच मृत्यू झाल्याचं दिसत आहे".
दिल्लीमधील दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात सतीश कौशिक यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मुंबईतील त्यांच्या घऱी आणण्यात येणार आहे.
सतीश कौशिक यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी होळीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. जावेद अख्तर यांनी मुंबईत 7 मार्च रोजी आयोजित केलेल्या होळी सेलिब्रेशनमध्ये ते उपस्थित होते. इन्स्टाग्रामला त्यांनी याचे फोटोही शेअर केले होते. कंगना रणौतचा इमर्जन्सी हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
सतीश कौशिक यांनी बॉलिवूडमध्ये करिअर सुरु कऱण्यापूर्वी अनेक नाटकांमध्ये काम केलं. सतीश कौशिक यांचं कॉमेडिच टायमिंग भन्नाट असल्याने त्यांच्या काही भूमिका प्रचंड गाजल्या. यामध्ये मिस्टर इंडियामधील कॅलेंडर, दिवाना मस्तानामधील पप्पू पेजर अशा भूमिकांचा समावेश आहे. 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुराल चित्रपटासाठी त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
सतीश कौशिक यांच्या मागे पत्नी शशी आणि मुलगी आहे. सतीश कौशिक यांची मुलगी वनशिका कौशिक 11 वर्षांची आहे.