Satish Kaushik Postmortem Report: बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर घटनाक्रम पाहता काही संशय उपस्थित करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी कोणतीही शंका राहू नये यासाठी मृतदेहाचं शवविच्छेदन (Postmortem Report) करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यामध्ये सतीश कौशिक यांच्या मृत्यूत कोणतीही संशयास्पद गोष्ट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे.
सतीश कौशिक मुंबईत होळी साजरी केल्यानंतर दिल्लीला गेले होते. दिल्लीमधील फार्म हाऊसवरही त्यांनी आपल्या मित्रांसह होळी साजरी केली होती. दरम्यान रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण रस्त्यातच त्यांनी प्राण सोडले. रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
शवविच्छेदन अहवालात सतीश कौशिक यांना हायपरटेंशन आणि डायबेटिजचा त्रास होता हे स्पष्ट झालं आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. पोलिसांनी सतीश कौशिक यांच्या निधनात अद्याप तरी संशयास्पद असं काहीच आढळलेलं नाही. चार डॉक्टरांच्या पॅनेलने सतीश कौशिक यांचं शवविच्छेदन केलं. पोलिसांनी याचे फोटो काढले असून, व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे.
रिपोर्टमध्ये सतीश कौशिक यांचं निधन ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचा उल्लेख आहे. यामुळे हृद्य रक्तवाहिन्यांचा धमन्या ब्लॉक आहेत. हे हृद्य रक्तवाहिन्यांचा विकाराशी संबंधित आहे. दरम्यान सतीश कौशिक यांचा व्हिसेराही जपून ठेवण्यात आला आहे. या सर्व गोष्टी रेकॉर्ड करुन ठेवल्या आहेत.
सतीश कौशिक यांच्या ह्रदय आणि रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल 15 दिवसांत मिळणार आहे. ब्लड रिपोर्टमुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतील असं पोलिसांचं म्हणणं आहे.
सतीश कौशिक यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या पार्टीत 20 ते 25 लोक सहभागी होते. सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पोलिसांनी पार्टीदरम्यानचं सात तासांचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलं आहे. पण पोलिसांना शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्हीत काहीच संशयास्पद आढळलेलं नाही.
दरम्यान पोलीस आणि क्राइम ब्रांच एफएसएल टीम पुष्पांजलीच्या त्या फार्म हाऊसवरही गेली होती, जिथे त्यांची तब्येत बिघडली होती. या ठिकाणी पोलिसांना काही औषधं सापडली आहेत. ही औषधंही तपासणीसाठी पाठवली आहेत. त्यांचा रिपोर्ट अद्याप यायचा आहे. या औषधांचा सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी काही संबंध असावा असं पोलिसांना वाटत नाही.