''शक्तिमान''चं पोस्टर प्रदर्शित; आदिनाथ कोठारे सुपरहिरोच्या भूमिकेत?

''शक्तिमान'' चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Updated: May 11, 2024, 01:55 PM IST
''शक्तिमान''चं पोस्टर प्रदर्शित; आदिनाथ कोठारे सुपरहिरोच्या भूमिकेत? title=

मुंबई : ''शक्तिमान'' चित्रपटाच्या या  पोस्टरमध्ये मराठीतील आघाडीचे कलाकार आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी आणि त्याबरोबर पदार्पण करणारा बालकलाकार ईशान कुंटे  यांची खास झलक पाहायला मिळते आहे. अर्थात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी आणि बालकलाकार ईशान कुंटे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुम्हाला चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येतोय  का? तरीही पोस्टरवरील  दोन गोष्टी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत ते म्हणजे चित्रपटाचे नाव ''शक्तिमान'' आणि त्याबरोबर लिहिलेली टॅगलाईन  "बाबा तू होऊ शकतोस सुपरहिरो"

भारतात या पूर्वी ''शक्तिमान'' या नावाने एक सुपरहिट मालिका सर्वांच्या परिचयाची आहे ज्यात भारतातल्या पहिल्या  सुपरहिरोची गोष्ट आहे आता त्या मालिकेचे आणि आदिनाथच्या ''शक्तिमान''चं काय कनेक्शन आहे किंवा काहीच नाही ? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत . 

मराठी प्रेक्षक हा दक्ष असतोच त्या बरोबर उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेण्यास नेहमीच तत्पर असतो त्यामुळेच  मराठी चित्रपटसृष्टीतील हा चित्रपट एका सुपरहिरोची संकल्पना आहे? किंवा हा एक अतिशय वेगळा प्रयोग आहे हे जाणून घेण्यास  प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित होण्याची नक्कीच वाट पाहतील अर्थात पोस्टरवरील हे मनमुराद हसणारं कुटुंब आणि "बाबा, तू होऊ शकतोस सुपरहिरो?" या टॅगलाईनने चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांचे कुतूहल वाढवलं आहेच. 

''शक्तिमान'' चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातील बालकलाकार ईशान कुंटे याचं चित्रपटातील पदार्पण असून हा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे  चित्रपट शूट होत असताना केवळ तो ६ वर्षांचा होता . 
 
हा नक्की कोणत्या धाटणीचा  चित्रपट आहे हे अजूनही समजलं नाहीय मात्र चित्रपटाचे नाव , टॅगलाईन आणि एक हसमुख कुटुंब  आणि आदिनाथने घातलेला सुपरहिरोचा लाल रंगाचा क्रेप यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालंय हे नक्की. या चित्रपटात मुख्य भूमिकेत  आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले असून निर्मिती मोशनस्केप एन्टरटेनमेंट ने केली आहे . 

मुख्य म्हणजे झी टॉकीज या महाराष्ट्रातील पहिल्या नंबरची  चित्रपट वाहिनी हा चित्रपटाला सम्पूर्ण सहकार्य  करत,  चित्रपट  प्रदर्शित होण्याअगोदरच झी टॉकीज वाहिनीने “शक्तिमान“ चित्रपटाचे  Satelite rights विकत घेतले आहेत , ही गोष्ट सुद्धा ''शक्तिमान'' या चित्रपटाविषयी वेगळी ठरते. हा सिनेमा २४ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.