कुमार मंगलम बिर्लांची कन्या, गायिका अनन्याला करावा लागला वर्णभेदाचा सामना

त्या प्रसंगाचा सामना केल्यानंतर ती म्हणाली....   

Updated: Oct 26, 2020, 06:47 PM IST
कुमार मंगलम बिर्लांची कन्या, गायिका अनन्याला करावा लागला वर्णभेदाचा सामना
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशातील उद्योग विश्वात मानाचं स्थान असणाऱ्या उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला  kumar mangalam birla यांच्या मुलीला परदेशात वर्णभेदाचा शिकार व्हावं लागलं आहे. सोशल मीडियावर तिनं याबाबतची पोस्ट लिहिली. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये गायिका अनन्या बिर्ला हिला तिच्या कुटुंबीयांसमवेत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. 

आई आणि भावासह सर्वांना या रेस्तराँमधून बाहेर काढण्यात आलं असं म्हणत तिनं या रेस्तराँवर वर्णभेदाचा आरोप केला आहे. 'हे रेस्तराँ अतिशय वाईट आहे. त्यांनी अक्षरश: मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांच्या हॉटेल परिसरातून बाहेर काढलं. हा वर्षभेद आहे. हे फारच वाईट आहे. तुम्ही ग्राहकांना चांगल्या पद्धतीने वागवण्याची गरज आहे. हे अजिबातच योग्य नाही', असं अनन्यानं ट्विट करत लिहिलं. 

 

जवळपास तीन तास वाट पाहिल्यानंतरही आपल्या आईशी चुकीच्या पद्धतीनं संभाषण करण्यात आल्याचाही मुद्दा तिनं या ट्विटमध्ये अधोरेखित केला. खुद्द नीरजा बिर्ला यांनीसुद्धा ट्विट करत हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलं होतं. तुम्हाला ग्राहकांशी असं वागण्याचा कोणताही हक्क नाही, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तर, आतापर्यंत आपण कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नसल्याची बाब मांडत वर्णभेद अस्तित्वात आहे, याबाबत बिर्ला यांचा मुलगा आर्यमन यानं खेद व्यक्त केला.