काय? नाट्यगृह सुरु होणार १२ जुलैला

“शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात १२ जुलै रोजी”

Updated: Jun 29, 2020, 05:38 PM IST
काय? नाट्यगृह सुरु होणार १२ जुलैला

मुंबई : आज दिवसभर सामाजिक माध्यमांवर चर्चा होती ती एका पोस्टर आणि व्हिडीओ क्लिपची. “शुभारंभाचा प्रयोग. तुमच्या सर्वात आवडत्या नाट्यगृहात. रविवार १२  जुलै, 2020” अशा आशयाच्या या पोस्टरने  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाटक सुरु होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे राहत आहेत.

हे नाटक नेमके कोणते आहे? ते कोण दिग्दर्शित करत आहे? त्यातील कलाकार कोण? प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे? लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली? प्रयोगाला येणाऱ्या रसिकांच्या सुरक्षिततेचे काय? असे अनेक प्रश्न आज मराठी नाट्यरसिकांमध्ये चर्चिले जात होते. 

या सर्व प्रश्नांची उत्तरे रसिकांना लवकरच मिळणार आहेत. पुन्हा एकदा जोरदार एन्ट्रीसह तुमच्या आवडत्या आणि जवळच्या नाट्यगृहात १२ जुलै 2020 रोजी हा शुभारंभाचा प्रयोग होत आहे.

रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. आता तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहिले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर  होणार आहे.