बई :
दिग्दर्शक- अभिषेक शर्मा
निर्माते- फॉक्स स्टार स्टुडिओज
कलाकार- सोनम कपूर, दुल्कर सलमान आणि इतर....
क्रिकेट आणि त्याभोवती फिरणारी एक काल्पनिक कथा, त्यातूनच फुलणारी प्रेमकहाणी या साऱ्या गोष्टी पाहता त्याच आधारे साकारला गेलेला चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवणार अशा अपेक्षा सुरुवातीपासूनच होत्या. अभिनेता दुल्कर सलमान, सोनम कपूर ही नवखी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांच्याच भेटीला आली आहे. पण, चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यापासून कथानकात पुढे काय घडणार याविषयीचा अंदाज लावता येतो.
अनुजा चौहान यांच्या पुस्तकावर आधारित कथानक या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. ज्यामध्ये वाचण्यासाठी सुरेख वाटणारे काही संदर्भ वास्तवात रुपेरी पडद्यावर मात्र तितकेशे प्रभावी वाटत नाहीत. प्रासंगिक विनोद काही वेळेस चेहऱ्यावर हसू आणतातही. पण, प्रत्येक वेळी हे तंत्र यशस्वी होणार नाही, हे मात्र चित्रपट जसजसा पुढे जातो तसतसं स्पष्ट होतं.
क्रिकेट, अंधश्रद्धा, नशीब यांच्या बळावर सोनमने साकारलेल्या झोया सोलंकीच्या आयुष्याला कशा प्रकारे एक कलाटणी मिळते हे दाखवत असतानाच भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी दाखवण्यात आलेला निखिल खोदा म्हणजेच अभिनेता दुल्कर सलमान सर्वांची मनं जिंकतो. हिंदी कलाविश्वात त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. मुळात दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रियतेचा कोणताही आव न आणता दुल्कर अगदी सहजपणे त्याच्या अभिनयाची जादू 'द झोया फॅक्टर'मध्ये करुन जातो.
क्रिकेटचा राग करणारी पण, एका जाहिरातीच्या कंपनीच ज्युनिअर कॉपीराईटर म्हणून काम करणारी झोया कामाच्याच निमित्ताने तिच्या या न आवडत्या वर्तुळात येऊन अडकते. कथानक भरकटत असल्याचा आभास होतानाच झोया आणि निखिलची केमिस्ट्री त्याला रुळावर आणण्यास मदत करते. पुढे अशा काही घटना घडतात देव्हा क्रिकेट नियामक मंडळही झोया संघासाठी 'लकी चार्म' आहे, यावर विश्वास ठेवू लागतं. न्याहारीच्या वेळी ती संघासोबतच असेल तेव्हा संघाच्या वाट्याला येणारं यश अटळ आहे, यावर शिक्कामोर्तबच होतं.
विश्वास, अविश्वासाच्या या सत्रात चित्रपटाच्या उत्तरार्धात बऱ्याच गोष्टी अधिक स्पष्ट होतात. चित्रपटात काही कलाकारांच्या भूमिका नेमक्या आहेत तरी का, असंही वाटू लागतं. पण, क्रिकेट सामन्यादरम्यानची दृश्य विशेष लक्षवेधी ठरतात. त्यासाठी दिग्दर्शकाची दाद दिली गेली पाहिजेच. चित्रपटातल्या काही गोष्टी वगळल्या तर एका हलक्याफुलक्या कथानकाच्या आधारे एकदा 'द झोया फॅक्टर' पाहायला काही हरकत नाही.