मुंबई : जीवनाच्या अमुक एका वळणावर आल्यानंतर जोडीदाराची साथ अतिशय महत्त्वाची असते. बऱ्याचजणांना ती मिळतेही. पण, आयुष्यभराची साथ देण्याची वचनं देऊन जेव्हा जोडीदार कायमस्वरुपी साथ सोडतो तेव्हा होणारा आघात शब्दांतही व्यक्त करता येत नाही.
एका अतिशय गाजलेल्या अभिनेत्रीवर नियतीनं असाच आघात केला आहे. 45 वर्षीय तामिळ अभिनेत्री मीना हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती, विद्यासागर यांच्या निधनामुळं ती पुरती कोलमडली आहे.
मीनाच्या पतीच्या निधनानंतर कलाजगतही हादरलं आहे. तिला आणि तिच्या मुलीला या आघातातून लवकरात लवकर सावरण्यासाठी बळ द्यावं अशी प्रार्थना हितचिंतकांनी केली आहे. (South indian Actress Meena Husband Vidyasagar passed away)
मीनाचे पती विद्यासागर, गेल्या काही काळापासून फुफ्फुसांच्या संक्रमणानं ग्रासले होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली.
सोमवारी रात्रीच्या सुमारास चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात विद्यासागर यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्यासागर बंगळुरूस्थित व्यावसायिक होते. 2009 मध्ये त्यांनी मीनाशी लग्न केलं होतं. या नात्यातून त्यांना नैनिका नावाची एक मुलगीही आहे. मीना आणि विद्यासागर यांची मुलगी आता 11 वर्षांची आहे. आईप्रमाणंच तिलाही कलाजगताची विशेष ओढ असल्याचं म्हटलं जातं.