मुंबई : नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. पुन्हा एकदा ते या पदावर विराजमान होत देशाचं पंतप्रधानपद भूषवणार आहेत. शासकीय थाटात पार पडणाऱ्या या मानाच्या सोहळ्यासाठी विविध राष्ट्रांच्या नेतेमंडळींसोबतच कलाविश्वातील काही चेहऱ्यांचीही उपस्थिती दिसण्याची शक्यता आहे. दाक्षिणात्य चित्रपट विश्वात नावारुपास आलेल्या आणि अभिनय क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेल्या रजनीकांत आणि कमल हासन यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याची माहिती आहे.
दोन्ही अभिनेत्यांच्या निमंत्रणाविषयी त्यांच्याशीच निगडीत सूत्रांनी माहिती दिली. पण, अद्यापही या दोन्ही कलाकारांकड़ून मात्र त्याविषयीचं कोणतंच अधिकृत वृत्त जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपच्या विरोधातीच भूमिकेमुळे मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख कमल हासन नेहमीच चर्चेत असतात. देशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येताच त्यांनी पक्षाच्या एकंदर कामगिरीचं कौतुक केलं खरं. पण, तामिळनाडूमध्ये मात्र या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे देशात असणाऱ्या मोदी लाटेचा तामिळनाडूवर काहीच परिणाम झाला नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली होती.
'थलैवा' रजनीकांतही राजकारणात सक्रीय होण्याच्या वाटेवर असून, आता येत्या काळात त्यांच्या कामगिरीवर साऱ्यांचं लक्ष असेल. दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशामिनित्त आणि पंतप्रधानांच्या कामगिरीनिमित्त त्यांनी मोदींचं कौतुक केलं होतं. राजकीय पटलावर या दोन्ही कलाकारांचा वावर पाहता आता मोदींच्या शपथविधी सोहळ्यात त्यांची उपस्थिती असणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 'बे ऑफ बंगाल इनिशिएटीव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल एंड इकॉनॉमिक कोऑपरेशन'(BIMSTEC)म्हणजेच 'बिमस्टेक'च्या नेत्यांची उपस्थिती आहे. 'बिमस्टेक'मध्ये भारतासोबत बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटान या देशांचा सहभाग आहे.