नाना पाटेकरांना क्लिन चिट दिल्याने तनुश्री दत्ता भडकली

तनुश्री दत्ताचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप 

Updated: Jun 13, 2019, 05:55 PM IST
नाना पाटेकरांना क्लिन चिट दिल्याने तनुश्री दत्ता भडकली

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या गैरवर्तवणूकीच्या आरोपांबाबत कोणताही पुरावा समोर न आल्याने नाना पाटेकर यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि मुंबई पोलिसांना भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे. 

गेल्या वर्षी तनुश्री दत्ताने 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी नानांवर गैरवर्तवणूकीचे आरोप लावले होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. परंतु आता या प्रकरणात कोणताही पुरावा नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे. नानांना याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. 

नाना पाटेकर यांना दिलासा मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी आणि कायदेशीर व्यवस्थेने एका अशा व्यक्तीला क्लिन चिट दिली आहे की, ज्यांच्यावर आधीही अनेक महिलांकडून लैंगिक शोषण केल्याचे आणि धमकवण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. 

न्यायालयाकडून पोलिसांतर्फे सादर करण्यात आलेल्या या अहवालाची तपासणी होऊन त्यानंतर या प्रकरणीचा अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. 

तनुश्री आणि नानांच्या या प्रकरणात पोलिसांनी बी समरी दाखल केली आहे. ज्यामध्ये पुराव्याअभावी एक खोटा खटला दाखल केल्याचं या अहवालात म्हटलं गेलं आहे.

ए समरी म्हणजे संबंधित प्रकरणाचा पुरावा नाही, बी समरी म्हणजे खोटा खटला आणि सी समरीमध्ये एखाद्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याविषयीचा तपशील असतो. या समरी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात येतात.