मुंबई : हिंदी कलासृष्टीत काही जोड्यांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. वैवाहिक आयुष्यात एकमेकांना साथ देत एकमेकांना पावलोपावली प्रोत्साहन करणाऱ्या अशाच जोड्यांमध्ये येणारं एक नाव आहे अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप हिचं. ताहिरा आणि आयुषमान कायम एकमेकांची साथ देतात, हे गेल्या काही काळात अधिक स्पष्टपणे समोर आलं. हा काळ तसा आव्हानाचाच होता, कारण, ताहिराला कर्करोगाचं निदान झालं होतं.
सध्या ती या आजाराला धीराने झुंज देत आहेत. याच दरम्यानस तिने आपल्या मानसिक स्वास्थ्याविषयी अत्यंत महत्त्वाची बाब उघड केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्यावर संवाद साधणं फार महत्वाचं असल्याचं तिने सांगितलं आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यदेखील फार महत्वाचं असं तिने सांगितलं. 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या वक्तव्याला आधार देत स्वत:चा अनुभव शेअर केला.
'मी कधी माझ्या शरीराला, आत्म्याला आणि डोक्याला एक समजलंच नाही. मी कायम माझ्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रीत केलं. मानसिक आरोग्य असं काही नसतंच मुळी, असा माझा समज होता. कर्करोग हा माझ्यातला नकारात्मक विचार होता आणि तो मला सतत सतावत होता. त्यासाठी मी खूप व्यायामदेखील केला', असं ताहिरा म्हणाली.
पुढे आपला अनुभव शेअर करताना ती म्हणाली, 'तरीदेखील अनेक विचार सतत माझ्या डोक्यात येत रहायचे. त्यावर माझ्याकडे एकच उपाय होता. मी रात्रभर रडण्याचा मार्ग अवलंबला. कारण सकाळी मुलांसमोर नेहमी चेहरा हसरा ठेवणं गरजेचं होतं. त्यावेळेस माझा मुलगा चार वर्षांचा होता तर मुलगी दोन वर्षांची होती.' आपला हा अनुभव सांगत आयुष्यातील कठीण प्रसंगांचा कशा प्रकारे सामना केला, हे ताहिराने सांगितलं.
ताहिरा सध्या स्तनाच्या कर्करोगाला झुंज देत आहे. तिच्या कर्करोगाचा प्रथम टप्पा असल्यामुळे तिच्या परिस्थितीत बरीच सुधारणा आहे. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधते. ती इन्स्टाग्रामवर सतत फोटोही शेअर करत असते.