मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकसत्रावर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी पार पडली. कोर्टानं पाचही कार्यकर्त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरातच स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिलेत. 6 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. 'मतभेदांना जागा दिली नाही तर लोकशाहीचा प्रेशर कुकर फुटेल' अशी टिप्पणीही सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केलीय. या प्रकरणात आता बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया सुरू झाल्यात. बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नानं सर्वात पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवलीय.
आपल्या 'सेन्स ऑफ ह्युमर'साठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नानं बुद्धिजीवी वर्गाच्या या अटक सत्रावर ट्विट केलंय. 'स्वातंत्र्य कधी एकदाच हिसकावून घेतलं जात नाही... एक-एक करून ते काढून घेतलं जातं... एका वेळी फक्त एक... एक सामाजिक कार्यकर्ता, एक वकील, एक लेखक आणि मग एक एक करत आपण सर्व...' असं ट्विंकलनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Freedom is not lost all at once, it is lost in units of one, one at a time, one activist, one lawyer, one writer till finally it’s each one of us..
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) August 29, 2018
ट्विंकल आपल्या निर्भिड स्वभावासाठी ओळखली जाते. यापूर्वीही तिनं आपल्या अंदाजात अनेक सामाजिक आणि राजनितिक मुद्यांवर आपलं म्हणणं मांडलंय.
बुधवारी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पाच सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटका सुप्रीम कोर्टानं संपूर्णत: चुकीचं असल्याचं सांगितलं. कोर्टानं या अटकेसाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस धाडत 5 सप्टेंबरपर्यंत उत्तराची मागणी केलीय. या दरम्यान न्यायालयानं या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेवर पोलिसांना आणि सरकारला 'मतभेदा'चा आवाज अशा पद्धतीनं न दाबण्याचा सल्लाही दिलाय.