मुंबई : छोट्या पडद्यावरील 'निमकी मुखिया' या कार्यक्रमात इमरती देवीच्या भूमिकेत दिसणारी ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचं निधन झालंय. या बातमीनं इंडस्ट्रीमध्ये शोकाकूळ वातावरण आहे. रीता या टीव्ही इंडस्ट्रीतल्या सर्वपरिचित असा चेहरा बनल्या होत्या. ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी सोशल मीडियावर रीता यांच्या मृत्यूची सूचना दिलीय.
'खूप दु:खानं मी ही बातमी देतोय, रीता भादुरी आपल्यातून निघून गेल्यात. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता अंधेरीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले जातील. आमच्या सगळ्यांसाठी त्या आईसारख्याच होत्या... त्यांची खूप आठवण येईल' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. गेल्या १० दिवसांपासून त्या मुंबईच्या सुजय हॉस्पीटलच्या आयसीयूमध्ये भरती होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रीता आजारी होत्या. त्यांना किडनीचा त्रास सतावत होता. त्यामुळे त्यांना एक दिवसाआड डायलिसिसची मदत घ्यावी लागत होती. त्या अवस्थेतही रीता आपलं शुटिंग पूर्ण करत होत्या... आणि वेळ मिळाल्यानंतर त्या सेटवरच आरामही घेत होत्या. त्यांच्या या मेहनतीनं सेटवरच्या सगळ्यांचं मन जिंकलं होतं. त्यामुळे सेटवर शुटिंगदरम्यानही त्यांचं काम थोडफार हलकं करण्याच्या प्रयत्नात सगळेच जण असायचे.
हिंदी आणि गुजरातीत त्यांनी जवळपास ५० सिनेमे आणि अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलंय. साराभाई वर्सेस साराभाई, अमानत, एक नई पहचान आणि बायबल की कहानिया या कार्यक्रमांतही महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसल्या होत्या.