दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या गानसम्राज्ञीची नव्वदी

लता मंगेशकर म्हणजे.... 

Updated: Sep 28, 2019, 10:59 AM IST
दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या गानसम्राज्ञीची नव्वदी title=
दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या गानसम्राज्ञीची नव्वदी

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 

आदरणीय,
      लता दीदींस.... 

लता मंगेशकर हे अनेकांसाठी एक नाव असलं तरीही काहींसाठी ती एक साधना आहे, काहींसाठी आदर्श आहे, काहींसाठी प्रेरणास्त्रोत आहे, काहींसाठी मोठी बहीण आहे तर काहींसाठी मायेने कुरवाळणारी दीदी आहे. भारतीय संगीत क्षेत्रात लता मंगेशकर या नावाचा व्यास असा काही मोठा आहे, जो खरंतर मोजणंही कठीणच. मुळात तो व्यास मोजण्याची कोणाची मजाल? 

तरीही मी आपला एक लहानसा प्रयत्न करु पाहत आहे. दीदी मी तुमच्यालेखी अगदीच लहान आहे, मुळात अस्तित्वाच्या शोधात आहे. तेव्हा या पत्रातून तुमच्याविषयी भावना जशा व्यक्त झाल्या अगदी तशाच मी लिहित आहे. 

लहानपणापासून घरात सुरु असणाऱ्या रेडिओच्या माध्यमातून दीदी तुमचीच गाणी कानांवर पडली. पुढे शालेय जीवनामध्ये पसायदानाच्या स्वरांतून तुम्ही रोज आम्हा विद्यार्थ्यांना भेटत होतात. आमच्यावर संस्कार करणाऱ्यांमध्ये जितका आई- वडिलांचा हात होता, तितकंच श्रेय या पसायदानाचंही होतं. शिवरायांचा इतिहास पुस्तकातून वाचला खरा. पण, त्याआधीच 'म्यानातून उसळे' या तुमच्या स्वरातील गीताने माझ्या मनात असं काही घर केलं होतं, की शिवबांचा इतहास अक्षरश: डोळ्यांसमोर उभा राहिला होता. 

'शिवकल्याण राजा'च्या निमित्ताने कानांवर पडलेला प्रत्येक शब्द हा मनावर कायमचा कोरला गेला. दीदी आयुष्य पुढे जात होतं. तुमच्याविषयी अनेकांकडून अनेक गोष्टी कानांवर पडत होत्या. त्या काळात रिऍलिटी शो ही नवी संकल्पना उदयास आली. तेव्हाच एका मराठी रिऍलिटी शोमध्ये तुमची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यावेळी घरात टीव्हीसमोर बसून तुम्हाला कार्यक्रमाचा आनंद घेताना पाहून तुम्हाला एकदातरी भेटावं याच इच्छेने मनात घर केलं. 

घरातही गायनकलेप्रती विशेष आवड असल्यामुळे तुम्हाला आमच्या कुटुंबात विशेष स्थान आहे बरं. अर्थात माझ्याप्रमाणे कित्येकांच्या मनात आणि कुटुंबात ते असेल यात शंका नाही. दीदी कसं हो जमवून नेलं तुम्ही हे सारंकाही? कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यापासून तुम्ही स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. 

आजच्या घडीला तुमच्या आवाजाची बरोबरी करणारं कोणी झालं नाही आणि होणारंही नाही. काळ बदलत गेला, नवे कलाकार, नवे ट्रेंड आले.... नवी नावंही आली. त्यांना स्वीकृतीही मिळाली. पण, यामध्ये आमच्या लतादीदी मात्र कायमच अग्रगणी होत्या आणि यापुढेही राहतील यात शंकाच नाही. 

दीदी वय वाढतंय आता.... काळजी घ्यायला हवी... तुमची काळजी करणारे साऱ्या विश्वात आहेत. हे पत्र तुमच्यापर्यंच पोहोचणार की नाही.... ठाऊक नाही.... पण, दीदी.... मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..... खूप खूप आदर आणि प्रेम. 

तुमची,
एक चाहती

...............

SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com